अजब राजकीय योगायोग ः पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेतेे
जळगाव- 23-Mar, 2021, 12:00 AM
जळगाव महापालिकेत एक अजब राजकीय योगायोग घडून आला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच घरातील दांम्पत्याला महापौर व विरोधी पक्ष नेते पद मिळाले आहे. जळगाव महापालिकेत 27 बंडखोर नगरसेवकांच्या बळावर महापौर पदावर जयश्री महाजन विराजमान झाल्या तर त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे.
जळगाव महापालिकेत 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत 75 पैकी 57 जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली तर शिवसेनेला अवघ्या 15 जागा मिळाल्या होत्या. तसेच एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले होते. यामुळे शिवसेनेचे सुनील महाजन हे विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत.
नुकतेच भाजपाच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. या बंडखोराच्या जोरावर शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या. मात्र भाजपाच्या या 27 बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही.
त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे पुन्हा शिवसेनेकडेच राहिले आहे. यामुळे पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेते हा अजब राजकीय योगायोग जुळून आला आहे.
या राजकीय योगायोगाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली आहे. तर या पती-पत्नीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
ZEYhNsjRq