विधानसभेत पोलिसांकडून आमदारांना धक्काबुक्की
पटणा- 24-Mar, 2021, 12:00 AM
मंगळवारी बिहार विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान चांगलाच गदारोळ झाला. हा गदारोळ अधिवेशनाच्या 20 व्या दिवशी पोलिस कायदा बिल 2021 च्या विरोधात झाला. बिहार विधानसभेत सशस्त्र पोलीस विधेयकावरुन जोरदार धिंगाणा झाल्यानंतर पोलिसांनी अनेक आमदारांना मारहाणही केली.
मंगळवारी सभागृहाची कारवाई 4 वेळा तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा यांना त्यांच्याच सभागृहात बंदी बनवले. यावेळी विरोधी आमदारांची DM आणि SSP सोबत धक्काबुक्कीदेखील झाली. यानंतर एक-एक करत विरोधी आमदारांना सुरक्षा रक्षकांनी सभागृहाच्या बाहेर फेकले. यादरम्यान, मकदुमपुरचे राजदचे आमदार सतीश कुमार दास बेशुद्ध झाले.
कारवाई सुरू झाल्यानंतर डॉ. प्रेम कुमार सभापती बनले, यावेळी विरोधी पक्षातील 12-13 आमदार वेलजवळ गेले आणि विधेयक फाडले. यादरम्यान ते रिपोर्टर टेबलावर चढले आणि टेबलही तोडला. दुसर्यांदा कारवाई सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडून CAG रिपोर्ट सादर करताना RJD आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी खुर्च्या आदळल्या. विरोध वाढल्यानंतर मार्शल सभागृहात आले.
यानंतर गोंधळ घालणार्या आमदारांना एक एक करत सभागृहा बाहेर काढले. आरजेडीचे सर्वेसर्वा आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनाही पोलिसांनी विधानसभेबाहेर काढलं. पोलिसांनी अनेक आमदारांना मारहाण केलीय. पायाला धरुन ओढून नेत सदनाबाहेर काढण्यात आलं. या सर्व राड्यानंतर जखमी आमदारांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.
या राड्यात आमदार सत्येंद्र कुमार यांनी आरोप केला आहे की, एसपींच्या सांगण्यावरुन त्यांच्या छातीत लाथ मारण्यात आली. छातीत मार लागल्याची तक्रार करत, हा फक्त अन्याय नाही तर लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
aoEHSzBwJUTPVl