सुएझच्या कालव्यात मालवाहतूक जहाज अडकले
वीरभूमी । ऑनलाईन 24-Mar, 2021, 12:00 AM
आपण सर्वांनी रस्त्यावरील ट्राफिक जॅमचा अनुभव कधी ना कधी घेतला आहे. घाईच्या कामात नक्कीच ट्राफिक जॅमचा प्रत्येकाला आलेलाच असतो. मात्र समुद्रातही ट्राफिक जॅम झाले आहे.
कारण सुएझच्या कालव्यात चीनहून मालवाहतूक करणारे एक महाकाय कंटनेर जहाज अडकले आहे. यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जॅम झाले आहे. सुएझ कालवा 193.3 किमी लांबीचा असून भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राला हा कालवा जोडतो. अडकलेल्या जहाजावर पनामा देशाचा झेंडा लावलेला आहे.
मंगळवारी सकाळी सुएझच्या कालव्यातून जाताना नियंत्रण गमावल्याने 400 मीटर लांब आणि 59 मीटर रुंद असणारे हे महाकाय जहाज अडकले. मालवाहतूक करणार्या जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टग बोट्स (जहाजांना धक्का देणार्या शक्तिशाली जहाज) तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीदेखील हे जहाज तेथून बाहेर काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
हे मालवाहतूक करणारे जहाज अडकल्यानंतर लाल सागर आणि भूमध्य सागराच्या किनारी मोठ्या संख्येने जहाज उभे आहेत. या कालव्याच्या माध्यमातून दररोज हजारो जहाद आशिया-युरोप दरम्यान प्रवास करत असतात. सुएझ कालव्यातील हा मार्ग आणखी काही काळ बंद राहिल्यास जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोपमध्ये जावे लागणार आहे.
पनामाचे हा कंटेनर चीनहून नेदरलँड्समधील रॉटरडॅम बंदरावर जात होते. या दरम्यान त्याने हिंदी महासागरातून युरोपमध्ये जाण्यासाठी सुएझ कालव्याचा रस्ता वापरला. मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 7.40 वाजता सुएझ कालव्याच्या उत्तर भागात अडकला. हे जहाज 2018 मध्ये तयार करण्यात आले होते. तैवानची ट्रान्सपोर्ट कंपनी एव्हरग्रीन मरीन या जहाजाला संचलित करत असल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तानुसार, एव्हर गिवेन या जहाजाच्या चालकांनी सांगितले की, सुएझ कालवा पार करत असताना एक वादळ आले. त्यामुळे जहाजाची दिशा बदलली. जहाजाची दिशा पूर्वपदावर करण्या प्रयत्न करण्यात येत असताना जहाज एका ठिकाणी अडकले. या जहाजामागे आणखी एक मालवाहतूक करणारे जहाज अडकले आहे.
Comments