आमदारांनाच शेतकर्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले
नाशिक । वीरभूमी- 24-Mar, 2021, 12:00 AM
महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या वसुलीवरून संतप्त झालेल्या शेतकर्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आलेल्या आमदारांनाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले.
ही घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील केरसाणे गावामध्ये घडली. कोंडून ठेवलेल्या आमदारांचे नाव दिलीप मंगळू बोरसे असे असून तासभरानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मतदार संघाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे हे केरसाणे गावामध्ये पोहोचले.
मात्र अवकाळी पाऊस व महावितरणने सुरू केलेल्या सक्तीच्या वसुलीने गावातील शेतकरी संतप्त झाले आहेत. महावितरणाकडून अन्यायकारक बिलं दिल्यानंतर, सक्तीची वसूली महावितरणाकडून होत आहे, याविरोधात आज शेतकर्यांच्या संतापाचा उद्रेक झाला, यावेळी शेतकर्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेल्या आमदार दिलीप बोरसे यांनाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले.
आमदार दिलीप मंगळू बोरसे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा शेतकर्यांनी त्यांना कार्यालयात बसवलं आणि त्यांच्यासोबत आत काही गावकरी देखील आहेत, तर काहींनी दार लावून ते ग्रामपंचायत कार्यालयसमोर बसले आहेत.
अवकाळी पावसाचा वरून मार पडतोय, एकीकडे कोरोनाच्या काळात पिकांना कोणताही भाव मिळाला नाही, आणि सरकारकडून अव्वाच्या सव्वा बिलं दाखवून, सुलतानी वसुली केली जात आहे.
तसेच वीज कंपनीने जे कनेक्शन तोडले आहेत, ते ताबडतोब जोडा अन्यथा आमदारसाहेबांना कार्यालयाबाहेर सोडणार नसल्याचा पवित्रा गावकर्यांनी घेतला, यानंतर आमदार दिलीप बोरसे यांची तासाभरात गावकर्यांनी सुटका केली.
Comments