कर्जत । वीरभूमी - 26-Mar, 2021, 12:00 AM
कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी त्यांची निवड जाहीर केली. मनीषा जाधव या कोरेगाव गणातून माजी सभापती पुष्पां शेळके यांच्या रिक्त जागेतून पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या.
सभापती आश्विनी कानगुडे यांचा ठरल्याप्रमाणे राजीनामा झाल्याने दि २६ रोजी कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची नियुक्तीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यावेळी सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा दिलीप जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
सदर अर्ज वैध ठरल्याने दुपारी २:३० वाजता पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी मनीषा जाधव यांची कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सदर निवडीसाठी आठ सदस्यापैकी सहाच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
यामध्ये आश्विनी कानगुडे, हेमंत मोरे, राजेंद्र गुंड, साधना कदम, प्रशांत बुद्धिवंत आणि मनीषा जाधव हे सभागृहात हजर होते. तर भाजपाचे बाबासाहेब गांगर्डे आणि ज्योती प्रकाश शिंदे मात्र सभापती निवडीच्या वेळेस गैरहजर राहिले. नूतन सभापती मनीषा जाधव यांचा सत्कार पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे, साह्यक पीठासीन अधिकारी अमोल जाधव यांनी सत्कार केला. यासह अनेक राजकीय पदाधिकारी यांनी जाधव यांचा सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, करमाळा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा नलिनी जाधव, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, नानासाहेब निकत, अशोक जायभाय, सुनील शेलार, शाम कानगुडे, शिवसेना शहर प्रमुख अशोक डोंगरे, विक्रम परदेशी, भालचंद्र पाटील, नारायणसिंग परदेशी, करणसिंग परदेशी , गंगासिंग परदेश आदी उपस्थित होते.
यावेळी निवडीच्या सत्कारास उत्तर देताना जाधव यांनी कर्जत-जामखेडचे आ रोहित पवार यांनी दिलेल्या संधीचे आपल्या सभापती कार्यकाळात निश्चित सोने करू. कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून आ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य पार पाडू अशी ग्वाही दिली.
यासह महाविकास आघाडीचा धर्म पाळत प्रशांत बुद्धिवंत सोबत राहिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.
HThFkBUgYr