लॉकडाऊनला भाजपापाठोपाठ राष्ट्रवादीचा विरोध
मुंबई : 29-Mar, 2021, 12:00 AM
राज्यातील वाढता कोरोना संसर्ग व कमी पडणार्या आरोग्य सुविधा यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने रविवारी बैठक घेऊन लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या.
या सुचनानंतर राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरपणे लॉकडाऊनला विरोध केला आहे.
तत्पुर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. भाजपा नंतर आता राष्ट्रवादीने जाहीरपणे लॉकडाऊनला विरोध केल्याने राज्यात लॉकडाऊनवरून वादंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे मलिक यांनी पुढे नमूद केले.
तसेच ते म्हणाले, लॉकडाऊनसाठी नियोजन करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली म्हणजे लॉकडाऊन आता अपरिहार्य आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते, असेही मलिक यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज लॉकडाऊनला आमचा विरोध असल्याचे सांगितले होते. अन्य पर्यायांचा विचार सरकारने करावा, असेही भाजपचे म्हणणे आहे.
दुसरीकडे व्यापारी वर्गातूनही लॉकडाऊनला आतापासूनच विरोध केला जाऊ लागला असून हा विषय नव्या वादाला तोंड फोडणार असे दिसत आहे.
oALiBbyfKVZgTdjv