अहमदनगर । वीरभूमी- 30-Mar, 2021, 12:00 AM
टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने भाड्याने चालवण्यासाठी घेऊन सदरची वाहने परस्पर गहाण ठेवून फसवणूक करणार्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.
हा आरोपी पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील असून त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 69 लाख रुपये किंमतीच्या 16 अलिशान कार जप्त केल्या आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील पिसोळ येथील महेश प्रताप खोबरे (वय 40) यांचा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. आरोपी दादा शशिकांत मारुती सातपुते (रा. भोयरे गांगर्डा, ता. पारनेर) याने फिर्यादी खोबरे यांच्याकडून मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये इनोव्हा क्रिस्टा, इर्टींगा, झेस्ट अशा एकूण 22 कार महावली एन्टरप्रायजेस नावाने भाड्याने चालविण्यासाठी घेतल्या होत्या.
त्यापैकी 9 कार आरोपी याने फिर्यादी यांना परत केल्या परंतू 13 कारचे भाडे व सदरच्या 13 कार फिर्यादी यांना परत केल्या नाहीत. यामुळे सुपा पोलिस ठाण्यात आरोपी शशिकांत सातपुते याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके, सपोनि. सोमनाथ दिवटे, पोसई. गणेश इंगळे, सफौ. नानेकर, पोना. सुरेश माळी, रवी सोनटक्के, शंकर चौधरी, दीपक शिंदे, पोकॉ. रवींद्र घुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल रणजित जाधव, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांच्या पथकाने
तपासात आरोपी दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते याला अटक करून त्याच्याकडून सात इनोव्हा क्रिस्टा, टाटा झेस्ट, दोन स्विफ्ट कार, एक एस क्रॉस कार, स्कार्पिओ, चार बीएमडब्ल्यू अशा दोन कोटी 69 लाख रुपये किंमतीच्या 16 अलिशान कार जप्त केल्या आहेत.
Comments