आ. राजळेंच्या राजकारणाला कोण देतेय शह
आ. राजळेंच्या राजकारणाला कोण देतेय शह
पाथर्डी । वीरभूमी- 31-Mar, 2021, 12:00 AM
अनेक दुःखद संकटानंतर सावरलेल्या आमदार मोनिका राजळे यांच्या राजकारणाला त्यांच्याच पक्षातील खा. डॉ. सुजय विखे हे शह देत असल्याचे समोर येत आहे.काही दिवसापासून याचा प्रत्यय आ. राजळे समर्थकांना येवू लागला आहे. यामुळे शेवगाव-पाथर्डीच्या राजकारणात भाजपा अंतर्गत दोन गट उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. आगामी येणार्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचे परिणाम भाजपाला भोगयला लागतील असे चित्र उभे राहु लागले आहे.
आज बुधवारी खा. डॉ. सुजय विखे व आ. मोनिका राजळे हे दोन्ही नेते पाथर्डी शहरात व तालुक्यात असतांनाही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही नेते व त्यांचे कार्यकर्ते एकत्र दिसले नाही. यामुळे आ. राजळेंच्या राजकारणाला खा. विखे शह देत असल्याच्या विचारावर शिक्का मोर्तब होत आहे.
भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे हे आज पाथर्डी तालुका दौर्यावर आले होते. त्यांनी पाथर्डीचे माजी आ. बाबुजी आव्हाड यांच्या जयंती महोत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर पाथर्डी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्याचे नियोजन होते. तसा निरोपही सर्व पदाधिकारी व अधिकारी यांना दिला होता.
मात्र तहसील कार्यालयातील आढावा बैठक ऐनवेळी रद्द करून बाबुजी आव्हाड महाविद्यालयात खा. विखे यांनी पाथर्डीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरिक्षक, आरोग्य अधिकारी यांच्याकडून कोरोना संसर्ग, गारपिट नुकसान, राष्ट्रीय महामार्ग व इतर कामांचा आढावा घेतला. मात्र या आढावा बैठकीची साधी कल्पनाही आ. राजळे समर्थकांना नव्हती.
एवढेच नव्हे तर आ. मोनिका राजळे याही योगायोगाने आज पाथर्डी शहरातच होत्या. त्यानीही भाजपा सदस्य नोंदणीसाठी नियोजित बुथ प्रमुख व भाजपा पदाधिकार्यांच्या ऑनलाईन बैठकील उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.
खा. सुजय विखे व आ. मोनिका राजळे हे दोन्ही नेते आज पाथर्डी शहरात असून देखील एकत्र दिसले नाही. यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा अंतर्गत दोन गट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
याची सुरुवात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीपासून झाली. आ. राजळे यांनी पाथर्डी तालुका सहकारी सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची जागा सुरुवातीलाच बिनविरोध होत असतांनाही विखे समर्थक संभाजी वाघ यांनी पत्नी मथूरा वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून राजळे यांच्या बिनविरोध निवडीला खो घातला. यानंतर हे प्रकरण थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पोहचल्यानंतर वाघ यांचा अर्ज निघाला व आ. राजळे बिनविरोध निवडून आल्या.
त्यातच विखे यांनी अभय आव्हाड यांनाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भटके विमुक्त मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यातूनही विखे यांना अभय आव्हाड यांना पाठबळ देत आ. राजळे यांना शह देण्याचा डाव आखला होता, अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवतात.
लोकसभा निवडणुकीत आ. राजळे यांनी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात विखे यांचे एकनिष्टेने काम करून सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले होते. यानंतर माजी आ. आप्पासाहेब राजळे यांच्या अमृत महोत्सव समारंभात आ. राधाकृष्ण विखे यांनी यापुढील काळात आम्ही आ. राजळे यांना कायम साथ देऊ अशी ग्वाही देत ‘काँग्रेसमध्ये असलेले तुमचे मामा जरी तुमच्या पाठीशी उभे राहीले नाही तर मामा म्हणुन मी तुमच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही देत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना चिमटा काढला होता.
अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून विखे विरुद्ध राजळे असा संघर्ष सुरू झाल्याचे पहावयाला मिळत आहे.
आगामी शेवगाव, पाथर्डी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हा संघर्ष टोकाचा झालेला दिसेल, यात शंका नाही. याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ivCjFehSMpQtZKuG