अगस्ति तालुक्याची भाग्यलक्ष्मी, तिला बदनाम करू नका
माजी मंत्री मधुकरराव पिचड । अगस्ति कारखान्याची सर्वसाधारण ऑनलाईन सभा खेळीमेळीत
अकोले । वीरभूमी - 31-Mar, 2021, 12:00 AM
अगस्ति कारखान्यात राजकारण आणू नका, कारखाना बंद पाडायचा असेल तर बंद करा मात्र, अगस्ती कारखाना तालुक्याची भाग्यलक्ष्मी असून तिला बदनाम करू नका. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे आहेत.ते दाखवले तर पळता भूई थोडी होईल, असा इशारा राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री तथा विद्यमान चेअरमन मधुकरराव पिचड यांनी दिला आहे.
अगस्ति सहकारी साखर कारखान्याची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झूम अॅपद्वारे ऑनलाईन पार पडली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानावरून माजी मंत्री मधुकरराव पिचड बोलत होते.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड, कार्यकारी संचालक भास्कर घुले, संचालक प्रकाश मालुंजकर, मीनानाथ पांडे, गुलाबराव शेवाळे, कचरू पाटील शेटे, रामनाथ बापू वाकचौरे, अशोक देशमुख, अशोक आरोटे, राजेंद्र डावरे, भाऊसाहेब देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, सुनील दातीर, भास्कर बिन्नेर, सौ. सुरेखा देशमुख, सौ. मनीषा येवले, बाळासाहेब ताजने उपस्थित होते.
या झूम ऑनलाईन सभेला 283 सभासद जोडले गेले होते. यावेळी बोलताना पिचड म्हणाले की, अगस्ति कारखान्यात आपल्याला राजकारण आणायचे नाही, तर आपण ते कधी येऊही दिले नाही. सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन आपण कारखाना चालविला.
तालुक्याने नेहमीच लोकशाहीचे कौतुकच केले आहे. जे सभासद नाही त्यांना देखील बोलण्याची संधी आपण दिली. मधली दोन वर्ष कारखान्यात राजकारण आणल्यामुळे कारखाना बंद पडला तेव्हा संपूर्ण तालुका आपल्याकडे आला आणि कारखाना चालवा, असे म्हटले म्हणून आपण तो चालवला.
विरोधक अपप्रचार करीत असून आज त्यांना आपण समोरासमोर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली असती. वेळ आल्यावर आपण त्यांच्या आरोपांना भक्कम उत्तरे देऊ.
यावर्षी ऊसतोडीचे थोडे नियोजन चुकले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या महिन्यात सर्व ऊस तोडला जाईल. पुढच्या वर्षी 75 टक्के ऊस कार्यक्षेत्रातील तर 25 टक्के ऊस बाहेरून आणू. अगस्ति कारखाना व सभासदांचा हिताचा आपण नेहमीच विचार केला.
आसवानी प्रकल्प सुरु करायचा तर त्यालाही विरोध केला आणि आता इथेनॉल प्रकल्प उभा केला तर त्यात त्यांना भ्रष्टाचार दिसतो. कर्ज घेतल्याशिवाय कारखाने चालवता येत नाही . पण विरोधक त्याचे भांडवल करून सभासदांची दिशाभूल करीत असले तरी सभासद जागरूक आहे.
यामुळे सभासद त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आम्हा संचालक मंडळाला बदनाम करण्याचा आहे. पण आमचा कार्यक्रम कारखाना स्वयंपूर्ण करणे व सभासदांना चांगला भाव देणे असा आहे.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रांत गेली 40 वर्ष पाणी अडविण्याचा कार्यक्रम राबविल्यानेच आज साडेचार लाख टन ऊस निर्माण झाला आहे. पाण्यासाठी आपण नेहमीच भांडत राहिलो. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून दिले. 40 वर्षात काय केले म्हणणार्यांना काम केले हेच उत्तर आहे. येणार्या तीन वर्षात आपण कारखाना कर्जमुक्त करू.
आदिवासी शेतकर्यांच्या नावावर हा कारखाना उभा केला. आज 18 हजार आदिवासी शेतकरी सभासद आहेत. अगस्ति कारखान्याचे भविष्य उज्वल असून अगस्ति कारखाना बुडू देणार नाही. प्रत्येक सभासदाच्या घरी जाईन पण हा कारखाना वाचविल. कारखान्याची क्षमता 2500 टनावरून 3500 टनांवर गेली असून शासनाने त्यास मान्यता दिल्याचेही पिचड यांनी सांगितले.
सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले. ते म्हणाले, अगस्ति कारखाना ही तालुक्याची कामधेनू आहे. त्याच्यावर अनेक कामगार, शेतकरी अवलंबून आहे. त्या कारखान्याची बदनामी होईल, पत कमी होईल, असे करू नका. राजकारण जरूर करा पण राजकारणाच्या ठिकाणी. अगस्ति कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. त्याची जरूर चौकशी करा. त्यात आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला फाशी द्या. शेतकर्यांना भाव देण्यासाठी कर्ज घेणे यात गैर काय आहे?
इथेनॉल प्रकल्पावर कर्ज घेतले ते अनाठायी वापरलेले नाही. कारखान्याच्या संपत्तीचे खोटे मूल्यांकन करून कर्ज घेतल्याचा आरोप विरोधक करतात यात तथ्य नाही. उसाचा आणि साखरेच्या भावात पाचशे रुपयांचा फरक असतो.
यामुळे दरवर्षी कारखान्याला 20 कोटींचा तोटा सहन करावा लागतो. साखर उद्योग अडचणीत आहे, आम्ही त्यातून मार्ग काढीत चाललो आहोत. प्रसंगी संचालकांच्या नावावर कर्ज काढून हा कारखाना चालविला जाईल. याचे भान विरोधकांनी ठेवावे, असेही गायकर म्हणाले.
या सभेत शेतकर्यांचे नेते दशरथ सावंत व बी. जे. देशमुख यांनी कारखाना प्रशासनाला काही लेखी प्रश्न विचारले होते. त्याला उत्तरे द्या. यावर कार्यकारी संचालक यांनी त्यास आपणास लेखी उत्तर दिले जाईल असे सांगितले.
चर्चेत सुरेश नवले, दिलीप नाईकवाडी, प्रमोद मंडलिक, विकास शेटे यांच्यासह आदींनी सहभाग नोंदविला. सभेची नोटीस वाचन भास्कर घुले यांनी केले तर गतवार्षिक सभेचे इतिवृत्ताचे वाचन मुख्य लेखापाल एकनाथ शेळके यांनी केले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी सभासदांनी विचारलेल्या सभासदांना उत्तर देताना सांगितले की, साखर निर्यात करताना कुठलाही गैरव्यवहार झाला नसून शासनाने ठरवून दिलेल्या नियमातच ती विक्री केली असून त्यातील निर्यात तोटा अनुदानही प्राप्त झाले आहे. यावर्षी सुमारे 44 कोटींची कर्ज फेड केली आहे. असेही ते म्हणाले. तर सभेच्या शेवटी आभार मच्छिन्द्र धुमाळ यांनी मानले.
"कै. मारुती भांगरे यांनी पंचनामा ही पुस्तिका प्रकाशित केली होती. यावर दशरथ सावंत, बी. जे. देशमुख यांनी संचालक मंडळाला याची उत्तरे द्या. यावर ज्या मारुती भांगरे यांनी दहा हजार पोती संचालक मंडळाला न विचारता विकली, त्या प्रकरणी त्यांना निलंबित केले.
त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची? असे म्हणत आम्ही त्याला लेखी उत्तर देऊ, इथे देण्याची गरज नाही, असे म्हणत सीताराम गायकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला."
Comments