पाथर्डी तालुक्यातील करोडीत नियम न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाई
पाथर्डी । वीरभूमी- 01-Apr, 2021, 12:00 AM
पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांच्या पथकाने आज गुरुवारी पाथर्डी तालुक्यातील करोडी या गावामध्ये अचानक भेट देऊन नियम न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाई करत नियम पाळण्याचे आवाहन केले.
पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी विनामास्क व नियम न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. एवढेच नाहीतर स्वतः गटविकास अधिकारी या तालुक्यातील प्रत्येक गावात जावून नियम न पाळणार्यांचे प्रबोधन करून दंडात्मक कारवाई करत आहेत.
आज गुरुवारी अशाच प्रकारे पाथर्डी तालुक्यातील करोडी येथे गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्यासह त्यांच्या पथकातील विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, ग्रामसेवक नितिन बटुळे व करोडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते.
या पथकाने करोडी गावामध्ये विनामास्क आढळून आलेल्या लोकांचे प्रबोधन करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी गावातील जी दुकाने आहेत, त्यांना भेटी देऊन ज्या दुकानांवर सॅनिटायझर ठेवण्यात आले नव्हते, त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई केली.
यावेळी गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी सांगितले की, नियम न पाळणार्यांवर कार्यवाही करणे हा उद्देश नसून लोकांनी नियमित मास्क वापरणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करणे, 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्रित न येणे व हात नियमित व वारंवार स्वच्छ धुणे याबाबत जनजागृती व्हावी व त्याचे महत्व कळावे म्हणून दंडात्मक कारवाई करावी लागत आहे.
मात्र प्रत्येकाने नियम पाळले तर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होवून कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रत्येकाने नियमाचे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी नागरिकांना केले आहे.
यावेळी ग्रामसेवक नितिन बटुळे, ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी नियम न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाई करत दंड वसूल केला.
Comments