लॉकडाऊन अजून टळलेला नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
मुंबई । वीरभूमी- 02-Apr, 2021, 12:00 AM
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत येत्या दोन-तीन दिवसात तज्ञांशी बोलून योग्य निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधतांना सांगितले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, येत्या काही दिवसात मी तज्ज्ञांशी, पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा उपाय काय तो सांगा. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवा म्हणता, तो वाढवतोच आहे. पण लसीने कोरोना होत नाही असं नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत लॉकडाऊन करायचा की काय ही शक्यता आहे. ती अजूनही टळलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज रुग्णवाढीचे धडकी भरवणारे आकडे समोर येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याबरोबर मर्यादित स्वरुपाचा लॉकडाउन देखील लागू करण्यात आला. कोरोना असाच वाढत राहिला आणि लोकांनी काटेकोरपणे नियम पाळले नाहीत, तर राज्यात कडक निर्बंधांचा किंवा लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.
मुख्यमंत्री ठाकरे सुरूवातीला म्हणाले, घाबरुन जाऊ नका. मी आपल्याला घाबरवण्यासाठी आलेलो नाही. तर आजची परिस्थिती काय, त्यावर मार्ग काढण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधतोय. आपल्याला आता एक वर्ष झालं. आपण एका विचित्र विषाणूसोबत दिवस काढतोय. मार्च महिन्यातच कोव्हिडने महाराष्ट्रात शिरकाव केला. त्यानंतर राक्षसासारखा महाराष्ट्रावर हावी झाला.
मधल्या काळात परिस्थिती नियंत्रणाल आली होती. आपण संयमी राहिल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या महिन्यात पार पडलं. लॉकडाऊन काळात जगाची आर्थिप परिस्थिती खराब झाली. तरीही अजित पवार यांनी संकटातही महाराष्ट्र पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला. महाराष्ट्रात राजकीय शिमग्याला सुरुवात झाली. पण मी त्याला आता उत्तर देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
लॉकडाऊन करणार का याचं उत्तर मी अजून देणार नाही. पण सध्याच्या परिस्थिती विषयी मी माहिती देईल. जेव्हा कोरोनाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला तेव्हा टेस्टिंगचे फक्त दोन लॅब होते. पण आज त्या दोनच्या पाचशे पर्यंत चाचण्या करणार्या संस्था तयार केल्या आहेत. आपण मुंबईत सध्या दररोज 50 हजार चाचण्या करतोय. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात क्षमतेपक्षा जास्त चाचण्या करतोय. दररोज 1 लाख 80 हजार चाचण्या करतोय. याच चाचण्या अडीच लाखांवर करणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
काहीही लपवत नाही आणि लपवणार नाही. महाराष्ट्रातील परिस्थितीत धक्कादायक जरी वाटत असली तरी जे सत्य आहे ते सांगत आहोत. इतर राज्यात वाढ नाही तुमच्याकडे का? या प्रश्नावर उत्तर देणार नाही. मला महाराष्ट्र प्यारा आहे. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे कुणी व्हिलन ठरवलं तरी माझी जबाबदारी पार पाडेल. पाडणारच ते माझं कर्तव्य. त्यामुळे घाबरु नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल. रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा.
कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणत त्यांच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे. आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे.
मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूया, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Tags :
Comments