हिंदू व्यापार्याकडून पवित्र 786 शुभांक असलेल्या नोटांचा संग्रह मशिदीला दान
श्रीगोंदा । विजय उंडे - 03-Apr, 2021, 12:00 AM
मुस्लिम धर्मीयांत पवित्र शुभांक असलेल्या 786 क्रमांकाच्या नोटा जमा करण्याचा छंद श्रीगोंदा येथील व्यावसायिकास जडला होता.
संकलित झालेल्या नोटा मशिदीच्या जिर्णोद्धारासाठी दान करण्याचा निर्णय येथील एका हिंदू व्यापारी भाविकाने घेतला.धार्मिक औदार्य जपण्याच्या व हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या या कृतीचे मुस्लिम समाजातून स्वागत होत आहे.
आपले नाव प्रसिद्ध करू नये अशी या व्यावसायीकाची इच्छा आहे. नावाप्रमाणेच मधुर असलेले व्यापारी कृषी बियाणे, औषधे व किटकनाशकासह प्रगतशील शेतकरी व उद्योजक म्हणून त्यांचा तालुकाभर लौकिक आहे. नोटेवर 786 हा क्रमांक दिसला की, ती नोट ते जतन करून ठेवीत. अनेक वर्षांच्या या छंदातून त्यांनी खूप सार्या नोटा संकलित केल्या.साचविलेल्या या नोटांचे पुढे काय करायचे हा प्रश्न उभा राहिला. समजपयोगी कामासाठी ही रक्कम खर्ची करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
श्रीगोंदा येथील माजी उपनगराध्यक्ष अख्तरभाई शेख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मग ही रक्कम येथील जामा मशिदीच्या जीर्णोद्धार कार्यासाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पत्रकार आरिफभाई शेख, डॉ. राज सय्यद, डॉ. इम्रान जमादार, हाजी अस्लम बेपारी आणि अख्तरभाई शेख यांच्या हस्ते ही रक्कम मशिदीच्या विश्वस्तांकडे सोपविण्यात आली.
सदर व्यक्तीने आपल्या आचरणातून धार्मिक सौहार्द व समरसतेचा संदेश व आदर्श दाखविला असून मुस्लिम समाज त्यांचा ऋणी असल्याची भावना यावेळी श्री.शेख यांनी व्यक्त केली. मशिदीच्या कामासाठी आणखी काही निधी लागला तरी आपण तो देऊ, अशी भावना या व्यवसायिकाने व्यक्त केली.
Comments