सुट्टी असतांनाही कर्जत तालुका प्रशासनाची कामांप्रती निष्ठा
कर्जत । वीरभूमी - 03-Apr, 2021, 12:00 AM
कर्जत तालुक्यात शुक्रवारी पुन्हा कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या सत्तरी पुढे गेली असून तब्बल 74 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली आहे.
कर्जत शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोनाचे रुग्णाने नागरीक देखील भयभीत झाले आहे. सुट्टीच्या काळात प्रशासन देखील स्वतः रस्त्यावर उतरत नागरिकांसाठी आपली तहान - भूक विसरून काम करीत आहे. शुक्रवारी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी बारडगाव सुद्रीक आणि बाभूळगाव खालसा येथील कोरोनाग्रस्त रुग्णांची भेट घेत स्थानिक प्रशासनास पुढील सूचना दिल्या.
कर्जत शहर आणि तालुक्यात दररोज कोरोनाबाधीत रुग्णाची द्वि आकड्या संख्येने प्रशासनाची भंबेरी उडवली आहे. मागील अनेक दिवसांपासून कर्जत शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार, दि 2 रोजी कर्जत तालुक्यात तब्बल 74 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कर्जत शहर 17, मिरजगाव 12 तर राशीन येथे 9 यासह इतर गावात 36 असे एकूण 74 रुग्ण मिळून आले आहेत.
वाढते कोरोना रुग्ण प्रशासनासह परिसरातील नागरिकांची देखील धडधड वाढवणारी ठरत आहे. या काळात शासकीय सुट्या असून देखील सर्व शासकीय अधिकारी आपली तहान-भूक विसरून रस्त्यावर उतरत काम करीत आहे. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी असताना देखील प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी बाभूळगाव खालसा आणि बारडगव सुद्रीक येथे प्रत्येक कोरोनाबाधीत रुग्णाची विचारपुस करीत अडी-अडचणी जाणून घेतल्या.
यासह येणार्या समस्येवर गाव पातळीवरील यंत्रणेस पुढील सुचना दिल्या. तसेच बारडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत कोरोना तपासणी आणि लसीकरणाचा आढावा घेत आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्याच्या सुचना केल्या.
Comments