संचारबंदी असतांनाही चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
शेवगाव । वीरभूमी - 05-Apr, 2021, 12:00 AM
शेवगाव शहरासह तालुक्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चक्क शेवगाव तहसील कार्यालयासमोरील टायरचे दुकान फोडून तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.
याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रात्र संचारबंदी असतांना शहरात चोरीची घटना घडल्याने पोलिस प्रशासन काय करतेय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगाव तहसील कार्यालयासमोर अभिजीत गर्जे यांचे टायरचे दुकान आहे. अभिजीत गर्जे हे शुक्रवारी रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून निपाणी जळगाव (ता. पाथर्डी) या आपल्या गावी गेले होते.
दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरच्या लोखंडी पट्ट्या तुटलेल्या दिसल्या व शटर एक फुट वरती केलेले दिसले.
तुटलेले शटर उघडून पाहिले असता दुकानातील टायर दिसले नाही. तसेच दुकानात लावलेला सीसीटीव्ही हार्डडिक्सही दिसून आला नाही. चोरट्यांनी नामांकित कंपन्यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे टायर्स, ट्यूब व इतर साहित्य असा 11 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
या अज्ञात चोरट्या विरोधात दुकानाचे मालक अभिजीत गर्जे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिासेंदिवस शेवगाव शहरासह तालुक्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच इतर गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रात्रीची संचारबंदी असतांना मुख्य रोडवर व तहसील कार्यालयासमोरील टायरचे दुकान फोडून दुकानातील 10 लाख रुपये किंमतीच्या टायरची चोरी झाल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
Comments