पंढरपूर । वीरभूमी- 05-Apr, 2021, 12:00 AM
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व शहर व परिसरातील मंदिरे दि. 5 एप्रिल 2021 (रात्री 8) ते शुक्रवार दि. 30 एप्रिल 2021 (रात्री 11.49) पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने घेतला आहे.
याबाबत श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दि.17/03/2020 ते दि.14/11/2020 या कालावधीत भाविकांना श्रींचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तद्नंतर मा.राज्य शासनाच्या आदेशानुसार दि.15/11/2020 पासून भाविकांना श्रीचे मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये सर्व धार्मिक व प्रार्धना स्थळे सोमवार, दिनांक 5 एप्रिल, 2021 (रात्री 8.00) ते शुक्रवार, दिनांक 30 एप्रिल, 2021 (रात्री 11.59) पर्यंत बंद ठेवण्याबाबत नमुद केले आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर व मंदिर समितीच्या अधिपत्याखालील पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे सोमवार, दि. 5 एप्रिल, 2021 (रात्री 8.00) ते शुक्रवार, दि. 30 एप्रिल, 2021 (रात्री 11.59) या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहेत. तथापि, श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील.
त्याच्या स्वरूपात किंवा तिच्या पध्दतीत कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत. तसेच इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
सदरचे पत्रक सदस्य आ.रामचंद्र कदम, श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, श्री. भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, श्री. संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अॅड.माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ. साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर
मा.सह अध्यक्ष श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
jpDZzkwMeSYoPnm