पाथर्डी । वीरभूमी- 06-Apr, 2021, 12:00 AM
वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊनची घोषणा करत कठोर निर्बंध लावण्यात आले. मात्र या निर्बंधाची अंमलबजावणी केल्यानंतर हा एका अर्थाने लॉकडाऊनच असल्याचे दिसू लागले आहे.
यामुळे आज पाथर्डी शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असून अशा लॉकडाऊनला विरोध दर्शवत, व्यावसायिकांना पूर्ण बंदचे आदेशाऐवजी काही तास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे पाथर्डीतील व्यावसायिकांनी केली आहे.
आजपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे याचे निर्बंध नसून तो एकप्रकारचा लॉकडाऊनच आहे. आज पाथर्डी शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत आपले व्यावसाय बंद ठेवले.
मात्र जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेले निर्बंध हे एकप्रकारचे लॉकडाऊन आहे. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून जाणार आहे. हातावरचे पोट असलेल्या दुकान कामगारांचा रोजगार बुडणार आहे. छोटे-मोठे व्यावसायिक यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार असून याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.
या अचानक आलेल्या आदेशानुसार किंवा निर्देशानुसार नागरिकात व व्यापारी वर्गामध्ये संभ्रम असून राज्य शासनाच्या विरोधात रोष व नाराजी पाहायला मिळत आहे. आज अनेक व्यापार्यांनी या आदेशांचा विरोध करत तहसीलदार शाम वाडकर यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या.
या आदेशाला कडाडून विरोध करत सरसकट लॉकडाऊन न करता काही ठराविक वेळ व्यवसायिकांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कापड व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सुवर्णकार, सराफ असोशियनचे पदाधिकारी व चप्पल बूट, जनरल स्टोअर्स, पान टपरी चालक, छोटे व्यापारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार शाम वाडकर म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मागील लॉकडाऊनमध्ये स्थानिक प्रशासनाला निर्णय घेता येत होते. मात्र आता निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याने स्थानिक पातळीवर काहीही निर्णय घेता येणार नाही.
मात्र आपल्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या जातील. शासन सर्वसामान्यांसाठी काम करत असून कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार शाम वाडकर यांनी केले.
xvkDzlfreoO