फांद्या तोडल्याने असंख्य झाडांची उंची खुंटणार । पर्यावण प्रेमींकडून नाराजी
सुपा । वीरभूमी- 07-Apr, 2021, 12:00 AM
वीज वाहक तारांना अडथळा निर्माण करणार्या अहमदनगर - पुणे महामार्गालगत असलेल्या झाडांचे शेंडे महावितरणच्या कर्मचार्यांनी छाटले.
ही घटना बुधवारी सुप्यानजिक पवारवाडी जवळ घडली. एकीकडे झाडे लावा- झाडे जगवाचा संदेश दिला जात असतांना दुसरीकडे सर्रास झाडांचे शेंडे तोडून नुकसान केले जात असल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत असे की, अहमदनगर-पुणे महामार्गावरील झाडे सुपा (पवारवाडी) रोड दरम्यान दौलत पेट्रोल पंप ते हरिदास पेट्रोल पंपादरम्यान असलेल्या वीजवाहक तारांच्या जवळ आली आहेत. वीजपुरवठा खंडीत होवू नये म्हणून महावितरणच्या कर्मचार्यांनी असंख्य झाडाचे शेंडे तोडून नासधूस केली.
अहमदनगर ते शिरुर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या दरम्यान असंख्य वडाची झाडे काढावी लागली होती. त्या बदल्यात रस्ता विकासकाने तेथे नव्याने झाडे लावली.
त्यानंतर त्याच झाडांच्या बरोबर वरतून महावितरणने वीज वाहक तारा ओढल्या. कालांतराने ही झाडे मोठी झाली व ती ताराच्या जवळ आली. भविष्यात काही धोका होऊ नये म्हणून बुधवारी महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी असंख्य झाडांची शेंडे तोडून नासधूस केली.
दहा ते पंधरा फुट उंचीचे झाड होण्यासाठी कमीतकमी दहा ते बारा वर्षाचा कालावधी लागतो. आशावेळी महावितरण कंपनीच्या ठेकेदारांनी मागचा पुढचा विचार न करता सरळ दिसेल तिथे विजेचे खांब रोवून झाडांवरून वीजवाहक तारा नेल्या. कालांतराने झाडे मोठाली झाल्याने या झाडांच्या फांद्या वीजवाहक तारांमध्ये शिरू लागल्या.
भविष्यात होणारा धोका विचारात घेऊन महावितरणच्या कर्मचार्यांनी भविष्याचा विचार न करता महामार्गालगत असलेल्या झाडांची शेंडे छाटून टाकली. या प्रकारामुळे भविष्यात या झाडांची उंची खुंटणार आहे. महावितरणच्या या कारभारामुळे पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
rnMFSHCWYKwzLyT