श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी- 08-Apr, 2021, 12:00 AM
कुकडी कालव्याच्या उन्हाळी आवर्तनासाठी 9 एप्रिलला सल्लागार समितीची बैठक होणार आहे.
या पार्श्वभूमीवर घोड व कुकडी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते राजेंद्र मस्के यांनी कालवा सल्लागार समितीवरील नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहूल जगताप, ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांना पत्र लिहून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यांसाठी आवर्तनाचा आग्रह धरुन शेतीसाठी पाणी मिळून देण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
पत्रात राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे की विखे, पाचपुते, जगताप, नागवडे आपण कुकडी आवर्तन सल्लागार समितीचे सदस्य असून आपणाकडून तालुक्यातील सर्वसामान्य जनता व शेतकर्यांची फार मोठी अपेक्षा आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासुन कुकडीचा पाण्यासाठी शेतकर्यांना संघर्ष करावा लागत आहे.
या वर्षात कुकडी कालव्याचे शेतीसाठी फक्त एकच आर्वतन मिळाले आहे. ते पण खरीप व रब्बी हंगाम संपत आल्यानंतर मिळाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना आवर्तनाचा पूर्ण फायदा मिळाला नाही. उशिरा आवर्तन आल्याने शेतकर्यांची पाण्यासाठी ओढाताण दिसून आली. तालुक्यातील सर्व लाभार्थी शेतकर्यांना पाणी मिळणे अपेक्षीत होते. कालव्यापासून फक्त 4 ते 5 कि.मी. अंतरावरील शेतकर्यांना पाणी मिळाले. परंतू टेलच्या शेतकर्यांना वंचित राहावे लागले आहे.
उन्हाळ्यात भूजल पातळी खालावली असून अनेक ठिकाणी विहिरी, बोअरवेल कोरडेठाक पडले आहेत. उष्णतेच्या तीव्रतेमुळे शेतीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असून आज अनेक शेतकर्यांना फळबागेसाठी टँकर चालू करावे लागले आहेत. येणारे आवर्तन शेतीसाठी मिळाले नाही तर तालुक्यातील शेतकर्यांच्या फळबागा व उभी पिके जळून खाक होतील.
चार तालुक्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा येथील शेतकर्यांची कोट्यावधी रुपयांची अपरिमीत हानी होणार आहे. हे टाळण्यासाठी 9 एप्रिलला होणार्या कालवा सल्लागार बैठकीत आपण आग्रहाने शेतीसाठी आवर्तनाची मागणी करून किमान 4 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी बाजू धरून बैठकीत आग्रह करावा. तरच सर्व तालुक्यातील शेतकर्यांना पाणी मिळेल. अन्यथा ही जनता आपल्याला माफ करणार नाही.
या पाण्याचे पुर्णत: श्रेय तुम्ही घेतले तरी चालेल. परंतु पाणी नाही आले तर याची जबाबदारी आपण स्वीकारावी कारण आजपर्यंत तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी व आजी-माजी पदाधिकार्यांनी पाण्याचे श्रेय घेऊ नये.
श्रेयासाठी भांडणारे नेते शेतकर्यांच्या जळालेल्या पिकांचे व नुकसानीसाठी कोणीच पुढे येत नाही ही शोकांतिका आहे. सल्लागार समितीचे सदस्य म्हणून तालुक्यातील शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, ही अपेक्षा राजेंद्र मस्के यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.
Comments