श्रीगोंदा । प्रतिनिधी- 08-Apr, 2021, 12:00 AM
महाराष्ट्रात कोरोना वादळाचा धुमाकूळ सुरू असून श्रीगोंदा तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज संक्रमित रुग्णसंख्या वाढल्याने शासकीय कोविड केंद्रात रुग्णांना जागा अपुरी पडू लागली आहे.
गुरुवार दि. 8 रोजी घेतलेल्या 387 रॅपिड अँटीजन चाचण्यात 63 जण संक्रमित आढळले तर नगर येथून आलेल्या घशातील अहवालात 24 जण पॉझिटिव्ह आले. गुरुवारी एकूण 87 जण पॉझिटिव्ह आले.
श्रीगोंदा शहरात गुरुवारी 11 जण पॉझिटिव्ह आले तर ग्रामीण भागात काष्टी-11, पारगाव सुद्रीक-9, आढळगाव-9, येळपणे-8, मांडवगण-6, वडाळी-5, घोडेगाव-4, लोणी व्यंकनाथ-4, लिंपणगाव-6, घोटवी-3, निंबवी-3, वांगदरी-3, बेलवंडी बुद्रुक-3 तर पिंपळगाव पिसा येथे 2 रुग्ण संक्रमित आले.
कोविड केंद्रात 75 जण उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 96 रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयात 10 जण तर 60 जण घरीच विलगिकरण मध्ये आहेत. आत्तापर्यंत 3,676 रुग्ण संख्या झाली आहे.
जादा कोरोना संक्रमित रुग्णांमुळे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी तालुक्यातील काष्टी व बेलवंडी ही गावे शनिवार दि. 10 पासून पुढील पाच दिवसांसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय आज घेतला आहे.
बंद काळात या गावांमध्ये फक्त वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे. किराणा, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी शुक्रवार दि. 9 रोजी नागरिकांना सवलत दिली आहे.
पिंपळगाव पिसा गावातील पाटील गल्लीसह काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
काष्टी गावात सध्या 73 जण संक्रमित आहेत तर बेलवंडी बुद्रुक येथे 54 जण कोरोना संक्रमित आहेत.
तहसीलदार प्रदिप पवार यांनी गुरुवारी या गावांची पाहणी करून पुढील पाच दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
dYOZzplcJrSLW