विद्यार्थ्यांना दिलासा ।
मुंबई । वीरभूमी- 09-Apr, 2021, 12:00 AM
राज्यातील वाढता कोरोना संसर्ग व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विदयार्थ्यांची मागणी विचारात घेऊन अखेर एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
परिक्षा पुढे ढकलण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. तसेच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तसेच अनेक विद्यार्थ्यांची मागणीही होती.
या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या रविवारी (दि.11 एप्रिल) रोजी होणारी राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. आता राज्य सरकारकडून लवकरच 11 एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आल्याचा आदेश काढला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहता परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हिड विषाणूची लागण होऊ शकते. तर अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणार्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे विद्यार्थ्यांकडून आता संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
CTZKgqBUOMpwrNJ