अपूर्ण रस्ता आणखी किती जणांचे बळी घेणार?
संतप्त आंदोलकांचा सवाल । कोल्हार - घोटी मार्गावर आंदोलन
अकोले । वीरभूमी- 09-Apr, 2021, 12:00 AM
ठेकेदाराने अपूर्ण ठेवलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातात अनेकांचे बळी गेल्याचा आरोप करत, ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अपूर्ण राहिलेला हा रस्ता अजून किती जणांचे बळी घेणार? असा तीव्र संताप व्यक्त करत आज अकोलेतील कोल्हार - घोटी महामार्गावर या रस्त्याच्या कामासाठी आज सर्वपक्षीयांचे व इंदोरी ग्रामस्थ यांचे वतीने आंदोलन करण्यात आले.अकोले येथील कोल्हार-घोटी रस्त्यावर झालेल्या या तीव्र आंदोलनात जनतेच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. यामुळे एक महिन्याच्या आत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदाराकरवी देण्यात आली. तब्बल तीन तास चाललेले आंदोलन यशस्वी झाले असले तरी ठेकेदाराने या कामात दिरंगाई केली तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
अकोले - कोल्हार - घोटी या रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम मंदावलेले आहे. त्यातच रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या खराब रस्त्याने आजपर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. याच रस्त्याने जात असताना सागर उर्फ विशाल नवले या तरुणाचा मोठा अपघात झाला आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे त्या ठेकेदारप्रती अकोले तालुक्यात संतापाचा उद्रेक झाला.
या ठेकेदाराने कामाकडे खूप दिवसांपासून दुर्लक्ष केल्यानेच या खराब रस्त्याचा सागर नवले हा नाहक बळी ठरला, असा आरोप करत या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आज आंदोलकांनी आंदोलनस्थळी केली. यापूर्वीही या खराब व अपूर्ण रस्त्यामुळे अपघात होऊन मृत्यूच्या घटना घडल्या असल्याची माहितीही यावेळी आंदोलकांनी दिली.
सर्व प्रथम सागर नवले याला श्रद्धांजली वाहून आंदोलन सुरू करण्यात आले. या ठेकेदाराच्या विरोधात अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय आंदोलन झाले. यामध्ये अशोकराव भांगरे, अॅड. वसंत मनकर, अशोक देशमुख, महेश नवले, मिनानाथ पांडे, मारुती मेंगाळ, सुरेश नवले, प्रदीप नवले, प्रदीप हासे, भानुदास तिकांडे, दौलत नवले, वैभव नवले, सिताराम नवले, विकास देशमुख, प्रमोद मंडलिक, रामहरी तिकांडे, विकास देशमुख, सचिन देशमुख, रवी मालुंजकर, राजाभाऊ कुमकर, अनिल कोळपकर यांच्यासह इंदोरी व अकोले येथील ग्रामस्थ मोठया संख्येने रस्त्यावर उतरले होते.
आंदोलन सुरू असताना शासनाचे प्रतिनिधी व ठेकेदार न आल्याने आंदोलक संतप्त झाले होते. अखेर ठेकेदाराचा प्रतिनिधी, कार्यकर्ते, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरक्षक अभय परमार यांची आंदोलन ठिकाणी चर्चा झाली. चर्चा अंती येत्या काही दिवसात ठेकेदाराबरोबर अकोले येथे बैठक लावणे. त्यामध्ये रस्त्याच्या अनुषंगाने नुकसान भरपाई व इतर प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.
तसेच रोडलगतचे विजेचे खांब शिफ्टिंग करण्यात यावे, विहीर बुजविणे आणि पहिल्या 15 दिवसात इंदोरी ते अकोले व पुढील 15 दिवसात शेकईवाडी ते किमान कळस पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही ठेकेदारा मार्फत देण्यात आल्याने तीन तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र यानंतरही ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाबाबत चालढकल झाली तर आंदोलकांच्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी अशोकराव भांगरे यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अपूर्ण काम ठेवू नये, अशी मागणी केली. मिनानाथ पांडे यांनी या रस्त्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आंदोलनाची माहिती देत हे आंदोलन गांभीर्याने घेण्यात यावे व सागर नवले यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
अॅड. वसंतराव मनकर यांनी ‘सागर नवले याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा’. अशी मागणी केली. महेश नवले यांनी आपल्या मागण्या तत्वतः मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगत त्या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. या रस्त्याचे काम आत्ताच तातडीने सुरू करण्यात यावे, असे सांगितले.
अशोकराव देशमुख यांनी तीव्र शब्दात ठेकेदारावर टीका करीत काम पूर्ण केले नाहीतर ठेकेदाराला बांधून ठेवण्यात येईल, असा इशारा दिला. तर माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांना अश्रू अनावर झाले होते. संदीप दराडे यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण झाले नाहीतर ठेकेदाराच्या तोंडात शेण घालण्याचे आंदोलन करू असा इशारा दिला. सुत्रसंचलन सुरेश नवले यांनी केले.
दरम्यान, ठेकेदाराने एका महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले असल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगत, आपण ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सर्व प्रमुख पक्षाचे प्रमुख प्रतिनिधी व इंदोरीचे प्रमुख कार्यकर्ते यांची पुढील आठवड्यात तहसील कार्यालयात बैठक घेऊन रस्त्याच्या संदर्भात असलेल्या सर्व प्रश्नांबाबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Comments