जनतेच्या मदतीसाठी युवक काँग्रेसने जाहीर केला हेल्पलाईन क्रमांक
श्रीगोंदा । वीरभूमी- 09-Apr, 2021, 12:00 AM
देशभर कोविड-19 महामारीच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यभर मिनीलॉकडाऊन प्रशासनाने जाहीर केला. प्रशासनाच्या आदेशाचे सर्वस्तरातुन पालन होत आहे. कोरोना महामारीचा सामना करताना सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता भासत आहे. चिंताजनक परीस्थिती असलेल्या रुग्णांना रेमडिसीवीर, लस वेळेवर उपलब्ध होत आहे. कोविड संक्रमित आढळल्यास नेमके काय करावे? हे रुग्णांना व नातेवाईकांना समजत नाही. अशा भांबवलेल्या परीस्थितीत या रुग्णांच्या व सामान्य नागरीकांच्या मदतीला युवक काँग्रेसची ‘आरोग्यदूत’ टीम मदतीला धावून येणार असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना वाबळे म्हणाले की, मिनी लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या मजूर कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप, गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्य वाटप, गावोगावी मास्क-सॅनिटायझरचे वितरण केले जाणार आहे.
जनजागृती, रक्तदान शिबिर आयोजित करणे, कोविड केंद्रांच्या अडचणी सोडविणे, रेमडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखून गरजवंत रुग्णांना पुरवणे व कुटुंबातील सदस्यांना भावनिक आधार देऊन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून युवक काँग्रेसची ‘आरोग्यदूत’ टीम कोरोना युध्द लढणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात युवक काँग्रेसचा ‘आरोग्यदूत’ प्रशासन, हॉस्पिटल व सामान्य नागरिकांमध्ये समन्वयाची भुमिका साकारणार आहे. यासाठी हेल्पलाईन नंबर 9923493333 हा जनतेला संपर्कासाठी खुला करण्यात आला आहे. या क्रमांकावर जिल्ह्यातील नागरिकांनी संपर्क साधावा अशी विनंती स्मितल वाबळे यांनी केली आहे.
वाबळे म्हणाले की, मागच्या लॉकडाऊन काळात युवक काँग्रेसने रक्तदान शिबिरे घेऊन राज्यात साडे अठ्ठावीस हजार रक्ताच्या बाटल्या जमा केल्या होत्या. यावेळी किमान 30 हजार बाटल्यांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा मोठा वाटा असणार आहे.
मिनी लॉकडाऊन संपल्यानंतर उत्कृष्ट आरोग्य सेवा देणार्या 14 आरोग्य दूतांचा सन्मान महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्हाभर युवक काँग्रेसचे ‘आरोग्य दूत’ सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देण्यासाठी सक्रीय झाले आहेत.
fZQSPmntLIWa