राजकारणाचा धंदा, धंद्याच राजकारण
नगरी हिटिंग । वीरभूमीचे विशेष सदर
अरुण वाळुंज । वीरभूमी - 09-Apr, 2021, 12:00 AM
राजकारण हा काही अमृताचा प्याला नाही. इथे चांगल्या चांगल्यांचे कार्यक्रम झालेले आपण बघतोच. ‘जसा माल, तसा ताल’ अशा पद्धतीने लोकशाही बाहुबली यांच्या हातामधले खेळणे बनून गेली.पुढार्यांच्या दावणीला बांधलेले सामाजिक कार्यकर्ते अन् तळवे चाटणे यालाच सर्वस्व मानणारा बुद्धीजीवी वर्ग फक्त बंद खोलीत आपली अक्कल पाजाळत राहीला. राजकीय नेते हे हाताच्या पाच बोटासारखे वागतात. कायम भांडताना दिसतात पण जेंव्हा खायची वेळ येते तेंव्हा हमखास एकत्र येतात.
याला अपवादही आहेत पण आजकाल दुर्मिळ झालेत, हे सत्य आहे. ज्यांना हे जमते त्यांची राजकारणावर पकड असते. नाहीतर स्वतःचा उदोउदो करत राहणे याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.
सत्ता ही चंचल असते. ती ना लग्नाची ना मोथराची! ती आली त्याच दिवशी जायला सुरुवात होते. फक्त किती काळ आपण टिकवतो? हेच हातात असते. खुर्चीला अनेक चाके असतात. जसे चांगले वैचारिक लोक हवे असतात तसे गुंडही लागतातच. साम, दाम, दंड, भेद हे राजकारणाचे अलंकार !
एखादेवेळी समाज ज्यांना गुंड म्हणतो अशा लोकांकडून कुठलेही कपट न ठेवता सहकार्य मिळते. पण, देवमाणसांची सध्या जास्तच भीती वाटते ! नैतिकतेच्या गप्पा मारणारे या बाबतीत कुणी धुतल्या तांदळाचे नाही. ‘हमाम में सब नंगे है’ हे एकमेव नागड सत्य खरे आहे.
सध्या कोंबडीचे पिल्लू मेले तरी कुठली चौकशी लागेल? याचा नेम नाही. बंगाल मध्ये जोरदार सभा होतात, महाराष्ट्रात पुढार्यांच्या सभा हाउसफुल्ल होतात. मग कुलूप काय फक्त गरिबांच्या दुकासाठीच असते काय? सध्या महाराष्ट्रात एक योगायोग आहे. सर्वच प्रमुख पक्ष केंद्र किंवा राज्य या रूपाने सत्तेत आहे. त्यामुळे आनंदी आनंद गडे असेच वातावरण सगळीकडे आहे.
हप्ते घेणे हा प्रकार आपल्या व्यवस्थेतला कायमचा दोष आहे. ती परंपरा पूर्वापार चालत आली आहे. सरकारी बाबूंचे मोठे योगदान यात नक्कीच असते! आरोप-प्रत्यारोप चालू राहतील त्यातून फारसे काही साध्य होत नाही. हे सर्वाना माहीत आहे. सर्वच जण या मांडवाखालून कधी ना कधी गेलेले आहेत. पकडला तो चोर नाहीतर दिवसा भांडण करून रात्री मॅनेज होणारे कितीतरी किस्से चवीने चघळले जातातच की!
गावच्या निवडणुकीत दोन सोयरे असणार्या गावच्या पाटलांचे भांडण झाले. आपल्या आपल्या नेत्यासाठी विरोधात लढले. भांडणेही झाली अन बोलायचे बंद झाले. आता निवडणूक संपून पाच वर्षे होत आहे तरीही दोन्ही घरात आजही दुरावा आहे. नेमके ज्या नेत्यांसाठी ते भांडले तेच एकमेकांचे या काळात सोयरे बनले. जर ते राजकारण वगळता एकत्र येऊ शकतात तर आपण आपले नाते का सांभाळू शकत नाही? राजकारण अन् वैयक्तिक संबध वेगळे ठेवायला शिकावेच लागेल.
थोड स्वतः साठी काम करावे लागेल, अन् दुसर्यांच्या बापासाठी मिशा काढायचे धंदे सर्वात आधी बंद करावे लागतील.
राजकारण हा एक गंभीर व्यवसाय आहे. कितीही असले तरी लक्षात ठेवा शेवटी तोही एक व्यवसायच आहे.
लेखक - अरुण वाळुंज, मो. 9604152654
xnMTmAPyIojzHNYs