शेवगाव । वीरभूमी- 13-Apr, 2021, 12:00 AM
वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यभरात हॉस्पिटल मध्ये बेड फुल्ल झाले आहेत. यामुळे अनेक कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. मात्र नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात बेड शिल्लक आहे. यामुळे नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भिती बाळगू नये, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरातील हॉस्पिटलमधील बेड अपुरे पडू लागले आहेत. अपुर्या बेडमुळे कोरोना बाधितांवर योग्य ते उपचार मिळण्यात अडचणी येतात. अशी परिस्थिती शेवगाव तालुक्यात निर्माण होऊ नये यासाठी तालुका प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.
कोरोना उपाययोजनांच्या दृष्टीने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सोमवारी शेवगाव शहरातील डॉक्टरांची तहसील कार्यालयात बैठक घेऊन बेडची संख्या व उपलब्ध बेड याबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच कोरोना बाधित रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करून नियमाप्रमाणे बील लावावे. अधिकचे बील आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.
यावेळी झालेल्या बैठकीनुसार शेवगाव शहरातील बेडची संख्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी जाहीर केली आहे. यानुसार शहरामध्ये शेवगाव ग्रामीण रुग्णालय, अथर्व हॉस्पिटल, श्री साई कोविड सेंटर, बडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशा चार ठिकाणी आयसीयू बेड 26, व्हेंटिलेटर बेड 4, ऑक्सिजन बेड 70, आयसोलेशन 30 असे बेड आहेत. यापैकी आयसीयू बेड 12, व्हेटिलेटर बेड 03, ऑक्सिजन बेड 31 व आयसोलेशन बेड 7 असे शिल्लक आहेत.
तर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व त्रिमूर्ती शैक्षणिक संकूल येथे कोविड सेंटर उभारले आहे. या दोन्ही कोविड सेंटरमध्ये 225 बेड असून यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे 3 व त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथील 150 असे 153 बेड शिल्लक आहेत.
मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये बाधित आढळणार्या रुग्णांमध्ये गंभीर आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना आयसीयू, ऑक्सिजन, आयसोलेशन, व्हेटिंलेटर अशा सुविधा तालुका पातळीवर अपुर्या असल्याने त्यांना अहमदनगर जिल्हा रुग्णांलयात उपचारासाठी पाठविले जाते.
मात्र वाढती कोरोना बाधितांची संख्या विचारात घेऊन तालुका पातळीवरच आयसीयू, आयसोलेशन, व्हेटिंलेटर व ऑक्सिजन अशा सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. अशा सुविधा तालुका पातळीवर उपलब्ध करण्यासाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन आणखी एका ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याच्या तालुका प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.
Comments