पाथर्डी । वीरभूमी- 16-Apr, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नियमावली तयार केली आहे.
या ग्रामपंचायतींनी गावामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आम्ही कोरोनाला रोखणारच असा निश्चय ‘कोरोना ग्राम समित्यांनी केला आहे. याच निर्णयाप्रमाणे सोमवारपासून अनेक ग्रामपंचायतीही नियमावली तयार करून कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
पाथर्डी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
दिवसेंदिवस वाढणार्या कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लावत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंदचे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही नागरिकांची गर्दी कमी होत नव्हती. परिणामी कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साखळी तुटणे महत्वाचे आहे. कोरोना रोखण्यासाठी परिस्थिती पाहुन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, मिरी, कासार पिंपळगाव, हनुमानटाकळी, येळी, खरवंडी कासार आदी मोठ्या ग्रामपंचायतीसह लहान ग्रामपंचायतींनीही स्वतंत्र नियमावली तयार केली आहे.
या नियमावलीमध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 (काही ठिकाणी सकाळी 7 ते 12) या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी 11 वाजेपासून दुसर्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. यामध्ये दवाखाने, मेडिकल, दूध संकलन विक्री यांना सूट दिली आहे. तर अत्यावश्यक सेवामध्ये असलेल्या किराणा दुकान, पिठाची गिरणी, कृषी सेवा केंद्र, कृषी मशनरी, हॉटेल, मिठाईची दुकाने, मटण-मच्छि विक्रीची दुकाने, फळ विक्रेते यांचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतींनी आज शुक्रवार पासून ही नियमावली अंमलात आणली असून दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो. मात्र तरीही काही व्यावसायिक दुकानाच्या बाहेर उभे राहुन व्यवसाय करतात. अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियम मोडणार्या दुकानदाराला 10 हजार रुपयाचा दंड करण्यात येणार आहे.
याचप्रमाणे पाथर्डी नगरपालिकेनेही नियमावली तयारी केली असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. मात्र याबाबतचा आदेश काढणे बाकी आहे.
मात्र पाथर्डी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कोरोनाला रोखण्यासाठी केलेली उपाययोजना वाखाणण्याजोगी आहे. या ग्रामपंचायतीने केलेल्या उपाययोजनांना नागरिकही चांगला प्रतिसाद देत असून सर्वांनी नियम पाळले तर लवकरच कोरोना साखळी तुटेल असा विश्वास निर्माण झाला आहे.
Comments