कर्जत । डॉ. अफरोजखान पठाण- 17-Apr, 2021, 12:00 AM
शनिवार-रविवार विकेंड लॉकडाऊन असताना कर्जत शहरात विनाकारण फिरताना आढळणार्या व्यक्तींना कोणताही दंड न करता थेट त्यांची कोव्हीड अँटीजन चाचणी करण्याचा अभिनव उपक्रम कर्जत पोलीस प्रशासन आणि कर्जत नगरपंचायतीने राबविला.
या उपक्रमामुळे काही काळ का होईना विनाकारण फिरणार्या व्यक्तींनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र आज पहायला मिळाले.
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि. 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक आडवड्याचा शनिवार आणि रविवार हा विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दोन दिवसात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल यांनाच वगळण्यात आले आहे.
शनिवार, दि. 17 रोजी विकेंड लॉकडाऊन असताना कर्जत शहरात विनाकारण बाहेर पडणार्या व्यक्तींना कर्जत पोलीस प्रशासन आणि नगरपंचायत यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अडवत त्यांना दंड न करता त्यांची प्रत्यक्ष जागीच अँटीजन कोरोना चाचणी घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला.
यावेळी विनाकारण फिरणार्या व्यक्तींनी अचानक घेतलेल्या प्रशासनाच्या या उपक्रमाचा चांगलाच धसका घेतला होता.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांनी घरी राहणे आवश्यक आहे. मात्र काही नागरिक विनाकारण शहर आणि गावात फिरताना दिसत असल्याने त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्यांची अँटीजन चाचणी घेण्याचा फंडा पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने वापरला आहे. निश्चित या उपक्रमाचा फायदा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव, नगर पालिका आरोग्य विभागाचे सागर भांडवलकर, पोकॉ. बळीराम काकडे, संतोष जसाभाटी, बाळासाहेब यादव, नितीन नरुटे, वसंत साठे, संतोष समुद्र, उमेश गलांडे, अशोक मोहोळकर, राकेश गदादे, आबा नेवसे, विलास शिंदे यांच्यासह पोलीस मित्र संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
विनाकारण फिरणार्या नागरिकांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्याचा उपक्रम पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने हाती घेतला होता. यामध्ये 25 व्यक्तीची अँटीजन चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाल्याने त्याची रवानगी कोव्हीड सेंटरला करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
यामुळे नागरिकांनी घरी राहा - सुरक्षित राहत आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी जाधव यांनी केले आहे.
jeTPHqMOXpC