शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांची खंत
कोपरगाव । वीरभूमी- 17-Apr, 2021, 12:00 AM
महाविकास आघाडीचे सरकार येऊन एक वर्ष होऊन गेले परंतु ग्रामीण भागातील शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकार्यांना तालुकास्तरावर शासकीय नियोजनात सामावून घेतले जात नसल्याची खंत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री कोपरगाव येथे आले व कृष्णाई मंगल कार्यालयात मिटींग झाली पण ज्येष्ठ शिवसैनिकांना कोणालाही माहीत नाही. म्हणायला सरकार आपले आहे पण शिवसैनिकांना काडीचा उपयोग नाही.
या अगोदर युती सरकार होते. तेव्हा कोपरगाव (कोल्हे) भाजपने पुरेपुर फायदा करुन घेतला आणि आता आघाडी सरकारचा फायदा तालुक्यात राष्ट्रवादी घेत आहे. सरकार कोणाचेही असो अधिकार्यांना फक्त काळे-कोल्हेच माहीत आहेत. आम्हा शिवसैनिकांना व माजी पदाधिकारी यांना कोणतेही निमंत्रण दिले जात नाही.
तालुक्यात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी अनेक शिवसैनिकांचे योगदान आहे. पण त्याचा विसर सर्वांना पडला आहे. तालुक्यात कित्येक शिवसैनिक आहे. पक्ष वाढीसाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे.
निदान त्यांचा तरी विचार व्हावा, असे मला वाटते. ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या म्हणी प्रमाणे सध्या चालू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामीण भागातील शिवसैनिकांना तालुकास्तरावर न्याय मिळणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री छगन भुजबळ कोपरगाव येथे आले असता देखील ग्रामीण भागातील सेनेच्या पदाधिकारी यांना सांगितले नाही.
प्रत्येकवेळी आम्हा शिवसैनिकांना डावलण्यात येणार असेल तर आपण या संदर्भात पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल केला आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर घालणार असल्याचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी म्हटले आहे.
Comments