टाकळी ढोकेश्वर । वीरभूमी- 20-Apr, 2021, 12:00 AM
दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे दुसर्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेले नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा भविष्यातील धोका अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात संचारबंदी, लॉकडाऊन आहे. परंतु लोक नियम मोडत आहेत. त्यामुळे तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील बाजारच्या ठिकाणी तोबा गर्दी दिसून येत आहे. हा बेजबाबदारपणा कोरोनाला आमंत्रणच देत आहे.
पारनेर तालुक्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली असून या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी जो काय पर्याय मिळेल तो आज केला जात आहे. तरीही काही गावांमध्ये लोक या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.
आज कुठेही सोशल डिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. काही लोकांचा वावर असा असतो की, जसे गावामध्ये फिरण्यासाठी आलेले आहेत. काहीजण तोंडाला मास्क देखील लावताना आपल्याला दिसत नाहीत.
अशा वातावरणामध्ये या रोगावर नियंत्रण आणायचे कसे? असा सवाल निर्माण होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत.
प्रशासन कारवाई करत असताना लागू केलेले निर्बंध न पाळता बाहेर पडण्यासाठी कारणे शोधली जातात. मात्र बाहेर पडल्यामुळे नाहक कोरोनाला आमंत्रण देण्याचे काम नागरिकांकडून होत आहे.
सध्या आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला आहे.
नागरिकांना हॉस्पिटल मध्ये बेड, रेमडिसीवेर व औषधे उपलब्ध होताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याचे अवाहन तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडून वेळोवेळी केले जात आहे. पोलीस प्रशासन नागरिकांना रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे.
पारनेर तालुक्यात विविध ठिकाणी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व पोलिक कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवत आहेत. यावेळी नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी या सर्वांकडून नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. जर आपले काहीही काम नसेल तर घरांमध्येच रहावे. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, अशी विनंती या सर्वांकडून करण्यात येत आहे.
टाकळी ढोकेश्वर मध्ये लॉकडाऊनचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. दिवसभर भाजीपाला मार्केट बंद असतो. परंतु ती आज सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असतो. या वेळेत लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ही गर्दी पाहिल्यानंतर प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भाजीपाला दारोदारी जाऊन विकण्यासाठी सांगितले असतानाही कोणी आदेशाचे पालन करताना दिसून येत नाही. यामुळे पूर्णपणे लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे दिसून येते.
Comments