स्वतःहून 70 ऑक्सिजन टाक्या हॉस्पिटलला केल्या सुपूर्द
श्रीगोंदा । विजय उंडे - 23-Apr, 2021, 12:00 AM
वाढत्या कोरोना संसर्गाच्या लढ्यात श्रीगोंदा तालुक्यातील फॅब्रिकेशनवाले जीवरक्षक बनल्याचे समोर आले आहे. या फॅब्रिकेशन व्यावसायिकांनी स्वतःहून तालुक्यातून 70 ऑक्सिजन टाक्या जमा करून हॉस्पिटलला सुपूर्द केल्या आहेत.
फॅब्रिकेशन व्यावसायिकांच्या या कृतीचे सर्वत्र कौतूक होत असून असाच आपण सर्वांचा एकोपा राहीला तर निश्चितच कोरोनाला हरवू शकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात सध्या कोरोना संसर्गाने थैमान घातले असून जवळपास 700 च्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. तालुक्यातील सर्व कोविड सेंटर व खाजगी हॉस्पिटल रुग्णांनी गच्च भरली आहेत. त्यातच ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते प्रत्यक्ष रणांगणात, सोशल मीडियावर आवाहन करून मदत करत आहेत.
तालुक्यातील वेल्डिंग व्यावसायिक व फॅब्रिकेशनच्या छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या कामात ऑक्सिजन सिलेंडरची गरज असते. पण लॉक डाऊनमूळे व्यवसाय बंद आहेत तहसीलदार प्रदिप पवार यांच्या आवाहनाला या व्यावसायिकांनी प्रतिसाद देत आपल्याकडील ऑक्सिजन सिलेंडर एकत्रपणे गोळा करून तुटवडा आलेल्या हॉस्पिटल व कोविड केंद्रांना मोफत पुरवून सामाजिक दायित्व जपले आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील गणेश इंजिनिअरिंग, साजन शुगर, विनोद हिरडे, विजयराज टेलर, राज इंजीनियरिंग यांनी मोठ्या प्रमाणात टाक्या उपलब्ध करून दिल्या. तसेच जय माता फॅब्रिकेशन, साई इंजिनिअरिंग, सुरज इंजिनिअरिंग, पिंपळे वेल्डिंग वर्क्स तसेच काष्टी मधील सर्व इंजिनिअरिंग वर्क्स व्यावसायिकांनी मदत केली.
सामाजिक कार्यकर्ते व फॅब्रिकेशन व्यावसायिक नाना शिंदे व सहकार्यांनी तालुक्यात सर्वत्र फिरून जवळपास 60-70 ऑक्सिजन टाक्या जमा केल्या व अजूनही कोणाकडे शिल्लक टाक्या असल्यास त्या जमा करण्याचे काम चालूच राहणार आहे.
ऑक्सिजन अभावी रुग्ण मृत्यूशी झुंज देत असताना या व्यावसायिकांनी एक पाऊल पुढे टाकून रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून एकजुटीने हा गौरवशाली प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल तालुक्यातून सर्वांचे कौतुक होत आहे.
Comments