नगर जिल्ह्यातील या सरपंचाचे पारावर बसणार्या लोकांपुढे लोटांगण
अहमदनगर । वीरभूमी- 25-Apr, 2021, 12:00 AM
संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग तीव्र वाढत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला. मात्र यानंतरही ग्रामीण भागातील नागरिक बेफिकीरपणे वागत आहेत. आजही ग्रामीण भागातील लोक बिनदिक्कतपणे घराबाहेर पडून दररोजची कामे पार पाडत आहेत.
काहीजण तर सकाळीच उठून गावाच्या पारावर येऊन बसणे, दिवसभर गावातील झाडाखाली येवून बसणे असे करतात. एवढेच नव्हे तर तोंडाला मास्क लावत नाहीत. सोशल डिस्टन्स पाळत नाही. अशा लोकांना ग्रामपंचायतीच्यावतीने वेळोवेळी सुचना देऊन घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र ग्रामस्थ घरात थांबण्याचे नाव घेत नसल्याने जिल्ह्यातील कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी चक्क अशा लोकांसमोर लोटांगण घालून घरी थांबण्याची साद घातली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती भयानक बनत चालली आहे. अनेक कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर बेड भेटत नाहीत. ऑक्सिजन, रेमडिसीवीर इंजेक्शन, औषधे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
असे असतांनाही कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेला कडक लॉकडाऊन पाळला जात नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्यावतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. सकाळ-संध्याकाळ ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने भोंग्याद्वारे घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही लोक बिनदिक्कत घराबाहेर पडतात.
एवढेच नाहीतर तोंडाला मास्क लावत नाहीत. पारावर बसतांना सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. दुकाने, व्यवहार बंद असल्याने घरात बसण्याऐवजी गावातील पारावर दिवसभर येऊन बसतात. वेळोवेळी सांगुनही नियम न पाळणार्या ग्रामस्थांसमोर कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी चक्क लोटांगण घालत बाबांनो घरातच थांबा, कोरोना साखळी तोडण्यास मदत करा, अशी विनवणी केली.
सरपंच कातोरे यांनी लोटांगण घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र यातूनतरी ग्रामस्थ बोध घेऊन कोरोना साखळी तोडण्यासाठीतरी घरात थांबतील का? असा प्रश्न निरत्तिरीतच राहीला आहे.
MGnSeorRxyjOLCQV