रांगेतील लोकांकडून नियमाला फासला जातोय हरताळ । आरोग्य केंद्र प्रशासनाचे दुर्लक्ष
शेवगाव । वीरभूमी- 27-Apr, 2021, 12:00 AM
मागील आठवड्यात कोरोना लसीकरणाच्या तुटवड्यानंतर अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारपासून लस देण्यास प्रारंभ झाला आहे. वाढता कोरोना संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने लस घेण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी होत आहे.
शेवगाव तालुक्यातील दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीचे 260 डोस उपलब्ध असतांना सुमारे 350 ते 400 लोकांनी रांगा लावल्या आहेत. रांगा लावतांना नागरिकांनी कोणत्याही नियमाचे पालन केलेले दिसत नाही. यामुळे ही गर्दी लसीकरण करून कोरोना टाळण्यासाठी झाली की, कोरोना संसर्ग वाढवण्यासाठी झाली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज सर्वत्रच कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. वाढता कोरोना संसर्गामुळे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच मागील आठवड्यात लसीकरणाचा तुटवडा असल्याने लसीकरण झाले नाही.
शेवगाव तालुक्यातील दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे लसीकरण केले जाते. मात्र सोमवारी लस शिल्लक नसल्याने लसीकरण झाले नाही. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा कोरोना लसीचे डोस प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोच झाले. यामुळे मंगळवारी लसीकरण होईल असे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले.
मंगळवारी लसीकरण होणार असल्याची माहिती कळताच मंगळवारी सकाळ पासूनच दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील भाविनिमगाव, शहरटाकळी, मठाचीवाडी, देवटाकळी, बक्तरपूर येथील नागरिकांनी गर्दी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीचे 260 डोस आले असतांना सुमारे 350 ते 400 लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर रांगा लावल्या आहेत. यामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे.
लसीकरणासाठी लागणारा केसपेपर काढण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या, मात्र सोशल डिस्टन्ससह शासनाचे सांगितलेली निमावली पाळली जात नाही. ही झालेली गर्दी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी झाली आहे की, कोरोना संसर्ग वाढवण्यासाठी झाली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच केसपेपर काढतांना एकच व्यक्ती दोन ते तीन जणांचे केसपेपर काढत असल्याने रांगेतील गर्दी कायम आहे.
एकच व्यक्ती अधिक केसपेपर काढत असल्याने रांगेतील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासन नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी कोणत्याच उपाय योजना करत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
Comments