कर्जत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत । अभिनव युवा प्रतिष्ठानची मदत
कर्जत । वीरभूमी- 27-Apr, 2021, 12:00 AM
कर्जत शहराला पाणीपुरवठा करणार्या नळ योजनेवरच बोअर घेतल्याने मागील तीन-चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा शहरवासीयांना फटका बसला आहे. महिला वर्गांना आणि विशेषतः रमजानच्या महिन्यात उपवास करणार्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
कर्जत शहराला पाणीपुरवठा करणार्या नळ योजनेवरच खेड-आखोनी फाटा (ता.कर्जत) येथे बोअर घेतल्याने कर्जत शहराला मागील तीन-चार दिवसांपासून निर्जळीचा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठा करणारी नळ योजना दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली असून लवकरच ती पूर्ववत करण्याची ग्वाही दिली आहे.
मात्र मागील तीन-चार दिवसापासून कर्जतच्या महिला वर्गांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागली. विशेषत: मुस्लिम महिलांना रमजान उपवास असून त्यांना पाण्यासाठी हातपंप अथवा इतर ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करावी लागली.
यावेळी अनेक महिलांनी नगरसेवक सचिन घुले आणि अभिनव युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते धनंजय लाढाणे यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ अभिनव युवा प्रतिष्ठानचा टँकर मोफत उपलब्ध करीत अनेक प्रभागात दिलासा दिला. यावेळी महिला वर्गानी घुले आणि लाढाणे यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले.
पाण्याची समस्या असल्यास अभिनव युवा प्रतिष्ठानला संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठाणकडून करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, कर्जत शहर आणि इतर ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी अभिनव युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधावा. किंवा 9960964266, 9766909936 या क्रमांकावर कॉल करत मोफत पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक सचिन घुले आणि अध्यक्ष धनंजय लाढाणे यांनी केले आहे.
अभिनव युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याने अनेकांना या टंचाई काळात दिलासा मिळत आहे. यासह कर्जतचे कोविड सेंटर, वृक्ष संगोपन आणि वन्यजीवाच्या पाणवठ्याना देखील मोफत पाणीपुरवठा अभिनव युवा प्रतिष्ठान करत आहे.
GxJdwnPQiaDloLNq