अहमदनगर । वीरभूमी - 30-Apr, 2021, 12:00 AM
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच असून आज यावर्षीचा उच्चांक झाला आहे. आज शुक्रवारी नगर जिल्ह्यात तब्बल 3953 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
तीन-चार दिवसापासून कमी होत असलेल्या कोरोना बाधितांच्या आकड्यामुळे नगरकरांना दिलासा मिळत होता. मात्र आज पुन्हा कोरोना विस्फोट झाला असून तब्बल 3953 कोरोना बाधित आढळून आले. ही वाढणारी कोरोना बाधितांची आकडेवारी धडकी भरणारी असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आज शुक्रवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये पाथर्डी तालुका वगळता सर्वच तालुक्याची आकडीवारी शंभरच्या पुढे आहे. यातील नगर ग्रामीण व संगमनेरने 300 चा आकडा पार केला असून श्रीगोंदा, राहुरी, राहाता, कोपरगाव, पारनेर या तालुक्यांचा आकडा दोनशे पार गेला आहे.
बेजबाबदार नागरिकांमुळे दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून लॉकडाऊनचाही कोणताही परिणाम होतांना दिसत नाही. त्यातच लस, ऑक्सिजन, रेमडिसीवीर व औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच बेडही फुल, वाढत्या कोरोना बाधिातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन केले तर कोरोना संसर्ग साखळी तोडू शकतो. मात्र नागरिकांमधून कोणत्याही नियमाचे पालन केले जात नसल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.
आज शुक्रवारी जिल्ह्यात 3953 कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1567, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 1505 तर अँटीजेन चाचणीत 881 असे 3953 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा 660 वर गेला असून नगर ग्रामीण 406, संगमनेर 349, श्रीगोंदा 298, राहुरी 285, राहाता 280, कोपरगाव 270, पारनेर 227, शेवगाव 199, जामखेड 180, श्रीरामपूर 170, नेवासा 159, अकोले 151, कर्जत 110, भिंगार कन्टेमेंट 79, पाथर्डी 58, इतर जिल्हा 41, मिलटरी हॉस्पिटल 25, इतर राज्य 06 असे रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
TIZKFHjwCrhQ