अहमदनगर । वीरभूमी - 05-May, 2021, 12:00 AM
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांनी आज पुन्हा नव्याने रेकॉर्ड केले आहे. जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून आज बुधवारी गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 4475 कोरोना बाधित आढळले आहेत.
दोन दिवसापूर्वी कमी झालेली आकडेवारी कालपासून पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. आज तर कोरोना बाधितांचे नव्याने रेकॉर्ड झाले आहे. जिल्ह्यातील नगर ग्रामीणचा आकडा 400 पार गेला आहे तर संगमनेर, श्रीगोंदाने 300 चा आकडा पार केला आहे. तर पारनेर, श्रीरामपूर, राहाता, कर्जत, कोपरगाव, राहुरी, अकोलेचा आकडा 200 पार गेला असून इतर तालुके शंभरच्या पुढे आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा एक दिवस जास्त तर एक दिवस कमी असा पाठशिवणीचा खेळ खेळत जिल्ह्यात आपले पाय रोवून बसला आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. काही केल्याने नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना बाढत असून प्रशासन हतबल झाले आहे.
यामुळे अनेक तालुक्यात जनता कर्फ्यूच्या नावाखाली दहा दिवसाचा कडकडीत बंद पाळण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी जनता कर्फ्यू सुरू असतांनाही आकडे वाढत असतांना चिंता व्यक्त केली जात आहे.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 1053, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 2385 तर अँटीजेन चाचणीत 1037 असे 4475 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर 766, नगर ग्रामीण 468, संगमनेर 386, श्रीगोंदा 300, पारनेर 286, श्रीरामपूर 283, राहाता 281, कर्जत 244, कोपरगाव 238, राहुरी 219, अकोले 204, नेवासा 156, शेवगाव 152, पाथर्डी 144, जामखेड 130, इतर जिल्हा 106, भिंगार कन्टेन्मेंट 92, मिलटरी हॉस्पिटल 09, इतर राज्य 11 असे रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे चिंता व्यक्त केली जात असतांना नागरिकांनी नियमाचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला नियमित मास्क लावावा, नियमित हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments