राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
करंजी । वीरभूमी- 08-May, 2021, 12:00 AM
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक गावातून लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांबरोबरच तरुणही आता पुढे येऊ लागले आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी होऊ नये म्हणून उपकेंद्रामध्ये देखील नागरिकांना लस देण्याची व्यवस्था आपण राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात प्राधान्याने सुरु केली आहे. लसीचे डोस वाढून येताच जिल्हाभरातील प्रत्येक उपकेंद्रात हा उपक्रम राबवला जाणार असल्याने यापुढे प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याने प्रतिपादन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत करंजी गावासह सातवड, भोसे, दगडवाडी, खंडोबावाडी, कान्होबावाडी या गावातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. यावेळी मंत्री तनपुरे यांनी करंजी येथे राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेची प्रत्यक्ष पाहणी केली व काही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
ना. तनपुरे यांनी उपकेंद्रामध्ये लसीकरणाची सोय केल्यामुळे आरोग्य केंद्रावर होणारी गर्दी थांबली आहे. तर आरोग्य उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यवस्था झाल्यामुळे ज्येष्ठांच्या सोईचे झाले असून गर्दीमुळे होणारा त्रास वाचणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी सांगीतले.
यावेळी मच्छिंद्र गोरे, सुधाकर अकोलकर यांनी गावात लस देण्याची व्यवस्था केली त्याबददल राज्यमंत्री तनपुरे यांचे आभार मानत मंत्रीमहोदयांनी राबवलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले.
लोहसर, चिचोंडी, मिरी येथील आरोग्य उपकेंद्राला भेटी देत देखील राज्यमंत्री तनपुरे यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, अमोल वाघ, माजी सरपंच रफिक शेख, युवानेते जालिंदर वामन, डॉ. होडशीळ यांच्यासह आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या.
BhGZLNjFRmel