तालुका हद्दीवरून पाथर्डीत लसबंद आंदोलन
तालुका हद्दीवरून पाथर्डीत लसबंद आंदोलन
पाथर्डी । वीरभूमी - 10-May, 2021, 12:00 AM
तालुक्याबाहेरील लोकांना पाथर्डी लसीकरण केंद्रावर लस घेण्यास प्रतिबंध करावा. या प्रमुख मागणीसाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने लसीकरण केंद्रावर ”लसबंद आंदोलन करून सुमारे तासभर कामकाज बंद पाडले. उद्या पासून आधार कार्ड पाहून प्रवेश देऊन बाहेरच्या लोकांना माघारी पाठवू. असा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनाचे नेतृत्व मुकुंद गर्जे व अमोल गर्जे यांनी केले.लसीकरणाचा तीव्र गोंधळ सुरू असून कोठे ही लस मिळत नाही. जेवढा कोठा मंजूर होतो, त्याच्या कितीतरी अधिक पटीत गरजूंची लसीकरण करण्यासाठी गर्दी होते. तीन दिवसांपूर्वी तर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.गर्दीमुळे सर्व नियम धाब्यावर बसवले जाऊन कोरोनाचा खरा प्रसार केंद्रावरून होतो असा अनुभव लोकांना आला.
आज सकाळी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते केंद्रावर आले. जोरात घोषणाबाजी करत केंद्रापुढे दारात बैठक मारली काहींनी रांगेत उभे असणार्या लोकांचे आधार कार्ड तपासले. त्यामध्ये नगर, शेवगाव, श्रीरामपुर, नेवासा, बीड, नाशिक आदी गावांचे स्त्री-पुरुष आढळून आले. यापूर्वी पुणे, बारामती, औरंगाबाद, बीड, विभागातून लोकांची उपस्थिती केंद्रावर होती. बाहेरगावचे लोक चटकन लस घेऊन निघून जातात आणि स्थानिक नागरिक तासनतास रांगेत उभे राहून लस संपल्याचे व नोंदणी नसल्याचे उत्तर ऐकून निघून जातात यामुळे हे आंदोलन घडले.
यावेळी मुकुंद गर्जे म्हणाले की, ऑनलाइन नोंदणी काही सेकंदात पूर्ण होऊन कोणीही कुठूनही पाथर्डीचे केंद्र मोकळे दिसताच क्लिक करतात. गेले तीन दिवसांपासून अहोरात्र जागून काहीजण मोबाईल वर लाईन मोकळी सापडण्यासाठी प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार मॅनेज असून मोठी साखळी यामध्ये कार्यरत आहे. ग्रामीण भागातही ऑफलाईन पद्धतीचा सावळागोंधळ सुरू असून लसीकरणाच्या माध्यमातून शासन- प्रशासनाकडून लोकांची भावनिक अडवणूक व मनमानी सुरू असल्याचा अनुभव येतो. शहरासाठी मंजूर कोटा ऑनलाईन दिसतो. प्रत्यक्षात बाहेरचे लोक लस लगेच घेऊन जातात मूळ पाथर्डीकर मात्र वंचित राहत आहेत.
तालुका ऊस तोडणी कामगाराचा व शेतमजुरांसह कष्टकरी वर्गाचा आहे. अनेकांकडे मोबाईल नाहीत, कहींना ती प्रक्रिया समजत नाही. त्यांना लसीकरण न करता तुम्ही मारणार आहात का? हा खरा प्रश्न आहे. सरसकट ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड पाहून लसीकरण करावे. त्यानंतर कर्मचार्यांनी ती माहिती संगणकात साठवून ठेवावी. लोकांची अडवणूक व दिशाभूल होत असेल तर कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. बाहेर तालुक्यातील लोक आम्ही आता पिटाळून लावू. तालुक्या बाहेरील कुणीही लोकांनी तालुक्याचे केंद्राचे नाव टाकू नये. आम्ही केंद्रात अशा लोकांना प्रवेश करू देणार नाही. शासनाने त्वरित बदल न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू. असा इशारा अमोल गर्जे यांनी यावेळी दिला.
यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी आंदोलकांशी संवाद साधून वरीष्ठा बरोबर बोलणे करून परिस्थिती निदर्शनास आणून देवु, असे आश्वासन दिले. काही वेळाने पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे फौजफाट्यासह आले व त्यांनी ही माहिती जाणून घेत वरिष्ठ अधिकार्यांशी बोलून मार्ग काढू असे सांगितले.
510msh