पीएम किसान योजनेचा हप्ता जमा
अहमदनगर । वीरभूमी- 15-May, 2021, 12:00 AM
अखेर एक महिण्याच्या प्रतिक्षेनंतर पी. एम. किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पुर्व तयारीत शेतकरी गुंतला असतांनाच पी. एम. किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाल्याने बी-बियाणे, खते व मशागतीसाठी या रक्कमेचा उपयोग होणार असल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मागील दोन महिण्यापासून कोरोना संसर्गामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतात पिकवलेला माल विकता येत नसल्याने शेतकर्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच खरीप हंगाम पूर्व तयारीसाठी लागणारे पैसे कसे उभे करायचे या विवंचनेत शेतकरी होता.
पी. एम. किसान सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता एप्रिल महिण्यात जमा होईल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती. मात्र तो हप्ता मे महिण्यात जमा झाला आहे. पी. एम. किसान सन्मान योजनेच्या देशातील तब्बल 9.5 कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये 19 हजार कोटी रुपयांचा शेतकरी सन्मान निधी जमा करण्यात आला आहे.
आज सकाळी योजनेच्या अनेक लाभधारक शेतकर्यांच्या मोबाईलमध्ये एसएमएस आला आहे. त्या एस. एम. एस. मध्ये म्हटले आहे की, आपल्याला हे कळवताना आनंद होत आहे की, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत एप्रिल 2021 ते जुलै 2021 अवधीसाठी असलेला रू. 2000 चा हप्ता आपल्या खात्यात जमा केला गेला आहे. ह्या महामारीच्या काळात हा आपल्याला विशेष प्रकारे उपयोगी पडेल. मी आपल्याला व आपल्या कुटुंबाला चांगले आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना करतो. - पंतप्रधान नरेन्द्र मोदी
असा एसएमएस आला आहे. ऐन कोरोना महामारी व खरीपाच्या तोंडावर पीएम. किसान योजनेचे पैसे जमा झाल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
LrAZwveYsFa