मन खंबीर ठेवा, पथ्य पाळा, आपण या संकटातून नक्की बाहेर येणार ः राम महाराज झिंजुर्के
शेवगाव । वीरभूमी- 21-May, 2021, 12:00 AM
शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी आदि फाउंडेशनच्या माध्यमातून शेवगाव येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब कोविड केअर सेंटर मध्ये योग्य उपचार, सकस आहारा बरोबरच धार्मिक प्रवचनाची मेजवानी मिळत आहे.
आज शुक्रवारी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे मनोधर्य वाढावे, त्याच्या मनातील भीती दूर व्हावी याकरिता जोग महाराज संस्कार केंद्राचे महंत ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी स्वत: कोरोना आजाराची भीती न ठेवत सामाजिक अंतर ठेवत कोरोना केअर सेंटर मध्ये येऊन प्रवचन केले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रासने, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक श्रीकांत मिसाळ, नगरसेवक महेश फलके, डॉ. मनीषा लड्डा व सेंटर मध्ये कार्यरत वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राम महाराज झिंजुर्के म्हणाले, शरीराची व्याधी वैद्य दूर करतात तर मनाची व्याधी दूर करण्याची क्षमता संत परंपरेत आहे. संत कीर्तन, प्रवचन या माध्यमातून माणसाचे मनोधर्य वाढवण्याचे कार्य करत असतात. तुम्ही मन खंबीर ठेवले व पथ्य पाळले तर या कोरोना सारख्या आजाराला तुम्ही नक्की पळवून लावू शकतात. 75 टक्के शरीराचे वैद्य तुम्ही आहात तर 25 टक्के तुमच्यासाठी झटणारे हे डॉक्टर व इतर मंडळी आहे. त्यामुळे तुम्ही या आजाराची भीती सोडून त्यायोग्य उपचार घ्या. आनंदी राहा तुम्ही लवकरच बरे होणार, असा विश्वास व्यक्त केला.
झिंजुर्के महाराज म्हणाले, भगवंताच्या नामस्मरणाचा महिमा मोठा आहे. विठ्ठल नामात विज्ञानाला अचंबित करणारी शक्ती आहे. नामस्मरणाचे बंधन नाही, ज्याला जो देव आवडेल, ज्याला जो धर्म आवडेल ते नामस्मरण करा, तो देव एकच आहे. नामस्मरणाने आपल्या अंतर्मनाची शक्ती वाढवून आपल्याला आजाराशी लढण्याची शक्ती मिळते, असे ह.भ.प. राम महाराज म्हणाले.
Comments