मुंबई । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल 12 सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आल्यानंतर आज दुसर्या दिवशी भाजपाच्या आमदारांनी बहिष्कार घालत विधानभवनाच्या पायर्यांवर प्रतिविधानसभा भरविण्यात आली. या प्रतिविधानसभेमध्ये भाजपाचे सर्व आमदार सहभागी झाले असून विविध प्रश्नावर मत मांडण्यात येत आहे.
भाजपाच्या प्रतिविधानसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रतिविधानसभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रवीण दरेकर, आ. मोनिका राजळे, आ. राम कमद, आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे आमदार सहभागी झाले आहेत.
प्रतिसभेच्या प्रारंभी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या महाराष्ट्रात, शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीयांचे, विद्यार्थी, एमपीएससीचे, विम्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर या सरकारमध्ये आवाज उठवला तर खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केलं जातंय. जे घडलंच नाही असं सांगून, धादांतपणे खुर्चीवरुन खोट बोलून या ठिकाणी आमदारांना निलंबित केलं जातंय म्हणून आज या विधानसभेत मी या सरकाच्या धिक्काराचा आणि निषेधाचा प्रस्ताव याठिकाणी ठेवतोय.
मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रस्तावावर चर्चा सुरु करावी आणि ज्या प्रकारे या सरकारचा कारभार सुरुये त्यासंदर्भात अनेक सदस्यांना आपलं म्हणणं मांडायचंय, या जुलूमी सरकारविरोधात आपली भूमिका मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती प्रतिसभा अध्यक्षांसमोर मांडली.
यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात लाखो तरुणांचा रोजगार गेला. अनेक उद्योग, व्यापार उध्वस्त झाले आहेत. या सरकारने कुठलाही आधार किंवा मदत केलेली नाही. जनतेचे प्रश्न मांडायचे कुठे. सरकार बोलू देत नाही. हे सरकार अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवते. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गमावलं आहे. शेतकरी वार्यावर असून शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव नाही, विम्याचे पैसे मिळत नाहीत. या सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी सर्व खटाटोप करत असल्याचा आरोप विखे यांनी केला.
Comments