पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना
पाथर्डी । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतांनाच तेथील डॉ. गणेश शेळके (वय 45, रा. बहिरवाडी, ता. नेवासा) यांनी कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार दि. 6 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील तिसगार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या करंजी उपकेंद्रावर आज मंगळवार दि. 6 जुलै 2021 रोजी सकाळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होते. दरम्यान उपकेंद्रावर समुदाय अधिकारी म्हणुन रुजु असलेले डॉ. गणेश शेळेके (रा. बहिरवाडी, ता. नेवासा) हे तणावाखाली असल्याचे दिसत होते.
लसीकरण सुरू असतांना त्यांनी तेथील एका कर्मचार्याला कागद व पेन मागितला व त्यांनी उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा आतून दरवाजा बंद करून घेतला. बराचवेळ झाल्यानंतरही डॉ. शेळके हे दरवाजा उघडत नसल्याने त्यांना आवाज दिला. मात्र तरीही काहीही प्रतिसाद न आल्याने तेथील कर्मचार्यांनी दरवाजा तोडून पाहिले तर डा. गणेश शेळके यांनी दालनातील छताच्या फॅनला गळफास घेतल्याचे दिसले.
यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळवल्यानंतर सपोनि. कौशल्य वाघ, अरविंद चव्हाण, सतिष खोमणे, भाऊसाहेब तांबे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
डॉ. शेळके यांनी कोणत्या कारणाने गळफास घेतले याची माहिती मिळू शकली नाही. पाथर्डी पोलिस पुढील तपास करत आहेत.
bhtBsLYSg