खा. विखेंकडून मनसे पदाधिकार्याला काही क्षणासाठी खासदारकी बहाल
खा. विखेंकडून मनसे पदाधिकार्याला काही क्षणासाठी खासदारकी बहाल
पाथर्डी । वीरभूमी - 08-Jul, 2021, 12:00 AM
रेंगाळलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण करण्यात अधिकारी व ठेकेदार हलगर्जीपणा करत असून आतापर्यंत या महमार्गाने अनेकांचा बळी घेतला आहे. या रस्त्याचे काम तातडीने पुर्ण न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा परिवहन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे व मनसेचे संतोष जिरेसाळ यांनी दिला. यानंतर खा. विखे यांनी मनसेच्या पदाधकिर्यांना देत प्रतिप्रश्न करत ‘तुम्ही माझ्या खुर्चीत बसा. समजा तुम्हीच खासदार आहात. मग सांगा रस्ता पुर्ण होण्यासाठी काय केले असते? तुम्ही सांगाल तो उपाय लगेच अंमलात आणू.’ असे सांगत काही क्षणासाठी आपली खासदारकी मनसे पदाधकिर्याला दिली. याची चर्चा दिवसभर शहरासह तालुक्यात सुरू होती.पाथर्डी शहरासह तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण व संथ गतीने चालणार्या कामांबाबत लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी डॉ. सुजय विखे यांनी अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकार्यांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रांताधिकारी देवदत्त केकाण, नायब तहसीलदार पंकज नेवसे, राष्ट्रीय महामार्गाचे श्री. तारडे, ठेकेदार व भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी अधिकार्यांना खडे बोल सुनावत धारेवर धरले.
दरम्यान बैठक सुरु असतांना तेथे परिवहन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे व मनसेचे संतोष जिरेसाळ यांनी एंट्री करत बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत काम कधी पुर्ण करणार, अजुन किती जणांचे बळी पाहिजेत, असे सवाल करत अधिकार्यांना जाब विचारला. तेवढ्यात खा. सुजय विखे यांनी ‘तुम्ही माझ्या खुर्चीत बसा, तुम्ही खासदार आहात असे समजा. तुम्ही रस्ता काम पुर्ण होण्यासाठी काय केले असते? असा प्रतिप्रश्न मनसे पदाधिकार्यांना विचारल्यामुळे सर्व उपस्थित आवाक झाले.
यावर मनसेचे अविनाश पालवे, मी राज साहेबांचा कार्यकर्ता आहे. काम पुर्ण न करणार्या अधिकारी व ठेकेदार यांना झोडून काढले असते, असे उत्तर दिले. यावर खा. सुजय विखे यांनी ‘यामुळे रस्ता काम पुर्ण होईल का?’ असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पालवे यांनी ‘ठेकेदार काम करत नसेल तर कारवाई करा’ असे सांगितले. यावर खा. सुजय विखे म्हणाले, या कामाशी माझा संबध नसतांना थेट संबध जोडून मला दोष दिला जातो. तरीही केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणुन मी खासदार झाल्यानंतर हा महामार्ग पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिल्या ठेकेदाराने काम चांगले केले नाही म्हणुन त्याला बदलून नविन ठेकेदार नेमला. आता तोही चांगले काम करत नसेल तर त्यालाही बदलू. मात्र रस्ता काम यामुळे पुर्ण होईल का? रस्ता काम पुर्ण होण्यासाठी नियोजन करावे लागेल, असे सांगत ‘माझा रस्ता आहे तर तो कसा पुर्ण करायचा तेही मीच ठरवेल.’ असे म्हणत ‘महामार्गावरील तिसगाव येथे भूसंपादन केले गेले. मात्र नुकसानग्रस्तांना भरपाई मिळाली नाही. ती रक्कम मिळेपर्यंत अधिकार्यांनी भूसंपादन करू नये. निवडुंगा येथील पुलाचे पृष्ठभागाचे सपाटीकरण नसल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत तात्काळ दुरुस्ती करावी. रस्त्यावर जेथे आवश्यक आहे तेथे प्राधान्याने पॅच मारा. या महिन्याअखेर शहराचे काम पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई अटळ आहे, असा इशारा देत बैठक आटोपती घेतली.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, अजय रक्ताटे, अॅड. प्रतिक खेडकर, बंडू बोरुडे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगरसेवक रामनाथ बंग, बबन सबलस, अमोल गर्जे, गोकुळ दौंड, अजय भंडारी, मनसेचे अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, वंचितचे अरविंद सोनटक्के, मंगल कोकाटे, भाग्यश्री ढाकणे, बबन सबलस आदींनी उपस्थित राहुन चर्चेत सहभाग घेतला.
कोणत्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला?
पहिले वर्षे असे तसेच गेले. दोन वर्षापासून कोविडसाठी निधी खर्च होतोय. यामुळे विकासकामांना निधी देता येत नाही. त्यातच काही कारण नसतांना राष्ट्रीय महामार्गाच्या अपुर्ण कामाचे खापर माझ्यावर फोडून दोष दिला जात आहे. माझा उमेदवारी अर्जच कोणत्या मुहुर्तावर भरला होता तेच समजेना, असे म्हणत आपली प्रतिक्रिया देत कपाळावर हात मारुन घेतला.
मुरुमाचे दोन प्रकार असतात
राज्यात सरकार नसल्यामुळे नगरपालिकांसाठी निधी मिळवण्यात अडचणी येत आहेत. रस्ता कामांची मागणीही वाढत आहे. बीले काढण्यासाठी एक तर रस्ता करण्यासाठी एक असे दोन प्रकारचा मुरुम वापरला जातो. निधी मिळत नसल्याने रस्त्यावर चांगल्या दर्जाचा मुरुम टाकून तो करावा. आपल्या भागात मुरुमाची काहीही कमतरता नाही, असे खा. विखे यांनी सांगताच एकच हशा झाला.
बैठकीला तहसीलदारांची गैरहजेरी
खा. सुजय विखे यांच्या दौर्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत पाथर्डीचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला तहसीलदारच गैरहजर होते. मंगळवारी डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या करतेवेळी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये तहसीलदार यांचा उल्लेख असल्याने ते गैरहजर असतील अशी चर्चा उपस्थितांमध्ये होत होती.
Comments