वीज कोसळली अन् कोरड्या माळरानावर पाण्याचे झरे वाहू लागले
पुणे । वीरभूमी- 11-Jul, 2021, 12:00 AM
बारामती तालुक्यातील कारखेल गावातील माळरानावर शुक्रवारी वीज पडली अन् तेथून पाण्याचे झरे वाहू लागले. यामुळे नैसर्गीक आपत्ती नेहमीच हानिकारक न ठरता कधी सुखदही ठरते याचा प्रत्यय आल्याने ग्रामस्थ आनंदी झाले. (The power went out and water started flowing on the dry orchard)
याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काही भागाला नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. तालुक्यातील ही सुमारे 22 गावे जिरायती पट्ट्यामध्ये मोडत असून येथील पर्जन्यमान 425 मिलीमीटरच्या आसपास असते.
या जिरायती पट्ट्यांमध्ये तालुक्यातील कारखेल या गावाचा समावेश होतो. मागील तीन दिवसापासून कारखेल गावात रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान वजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. त्याच दरम्यान कारखेलचे ग्रामदैवत कोरेश्वर मंदिर असलेल्या माळरानावर वीज कोसळली.
कोरेश्वर मंदिराच्या परिसरात ज्या ठिकाणी वीज कोसळली तेथून पाण्याचे झरे वाहू लागले आहेत. त्या भागात शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या व शेतकर्यांना जमिनीतून अचानक पाणी वाहु लागल्याचे दिसताच सर्वजन आवाक झाले. वीज पडली त्या ठिकाणी मोठा पाण्याचा साठा तयार झाला होता.
ही घटना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी शनिवारी मोठी गर्दी केली होती. कायमच दुष्काळी असलेल्या गावात वीज पडल्याने गंगा अवतरली असल्याच भावना उपस्थित ग्रामस्थांनी बोलून दाखविली.
यामुळे नैसर्गिक आपत्ती नेहमी हाणी न ठरता कधी कधी सुखद धक्काही देऊन जाते याची प्रचिती येते.
VfeltGWdaOCzn