पाथर्डी । वीरभूमी- 12-Jul, 2021, 12:00 AM
खा. प्रितमताई मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात डावलल्याने मुंडे समर्थकांनी राजीनामा दिले आहेत. या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी उद्या मंगळवार दि. 13 रोजी मुंबईत समर्थकांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे. आता समर्थकांनी दिलेले राजीनामे मंजूर होणार की, त्यांना राजीनामे मागे घेण्याच्या सुचना केल्या जाणार याकडे लक्ष लागले आहे.
नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या विस्तारामध्ये बीडच्या खासदार प्रितमताई मुंडे यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा समर्थकांची होती. मात्र ऐनवेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामधून खा. मुंडे यांना संधी न मिळाल्याने मुंडे समर्थक नाराज झाले.
या नाराज समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामा देण्यास सुरुवात केली. बीड जिल्ह्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव मधील काही समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.
यामध्ये पाथर्डी पंचायत समितीच्या सुनीता दौंड, पाथर्डी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, जिल्हा चिटणीस सचिन पालवे, शहराध्यक्ष अजय भंडारी, तालुका चिटणीस नागनाथ गर्जे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन वायकर, बाजीराव गर्जे, अजित शिरसाट, सुनील पाखरे, अप्पासाहेब शिरसाट, अंबादास पालवे, बाबुराव बांगर, रामहरी खेडकर, युसूफ शेख, नारायण पालवे, येळीचे उपसरपंच संजय बडे आदींचा समावेश आहे.
तर शेवगाव तालुक्यातून ढोरजळगाव येथील गणेश कराड, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कचरू चोथे, कमलेश गांधी, आंबादास ढाकणे, गुरुनाथ माळवदे आदींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या सर्व राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी 10.30 वाजता मुंबईत बैठक होत आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या राजीनाम्यानंतर दिल्ली येथे जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत पंकजा मुंडे यांना राजीनामा दिलेल्या समर्थकांची समजूत काढण्याचे सांगितल्याचे बोलले जात आहे. मात्र या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
अरे रडताय काय लढायला शिका ः दत्ता बडे
तालक्यातील येळी येथील मुंडे समर्थक दत्ता बडे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून अरे रडताय काय लढायला शिका. स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी आयुष्यभर या चांडाळ चौकडीच्या विरुद्ध संघर्ष करून आपले विश्व निर्माण केले होते. कुठ पर्यंत चपला उचलता स्वाभिमानाने हातात हात घालून लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी स्थापन करून येणारी प्रत्येक निवडणूक लढवून भाजपाला मुंडे नावात काय ताकद आहे हे दाखवून देऊ... असे म्हणत वेगळा पर्याय दिला आहे.
HDOSlQhPaKpui