शिवसंपर्क अभियानाला अकोल्यातुन प्रारंभ
मी तुमचा आमदार म्हणून काम करील ः ना. शंकरराव गडाख
अकोले । वीरभूमी- 12-Jul, 2021, 12:00 AM
अकोले तालुक्याला चळवळीचा मोठा इतिहास आहे. हा क्रांतीकारकांचा तालुका आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियानाची सुरूवात अकोल्यातून होत असून मी येथे केवळ भाषण देण्यासाठी आलो नसून मी तुमच्याशी हितगुज साधणार आहे. खरं तर आज मी तुमच्या घोषणांनीच प्रभावीत झालो आहे. तुम्हाला आमदार नाही असे समजू नका, मी तुमचा आमदार म्हणून काम करील, असे प्रतिपादन मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक राज्याचे जलसंपदामंत्री ना. शंकरराव गडाख यांनी केले.आज अकोल्यातुन शिवसंपर्क अभियानाची सुरूवात करण्यात आली. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे होते. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, नगरसेवक प्रमोद मंडलिक, अकोले शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, युवा नेते प्रदीप हासे, रामहरी तिकांडे, अशोक मोरे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. गडाख पुढे म्हणाले की, सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना 24 हजार कोटीची कर्ज माफी केली. कोरोनाच्या माहामारीच्या काळात ठाकरे सरकारने अतिशय चांगले काम केल्यामुळे केंद्र शासनाने त्यांचे कौतुक आणि गौरव केलाच. त्याची दखल घेवून जागतिक पातळीवर देखील त्यांचा गौरव झाला. त्याचा राज्यातील तमाम शिवसैनिकांना स्वाभिमान वाटतो. म्हणुनच आजपासून आपण सर्वांनीच शिवसेना संपर्कातून गावागावात व मनामनात शिवसेना भरवण्याचा काम सुरू करायचं आहे. तसेच सदस्य नोंदणीचे काम देखील करावयाचे आहे.
मी तुमच्यासाठी तुमचा आमदार म्हणून काम करीन, तुम्हांला आमदार नाही असे समजू नका. एमआयडीसीसाठी देखील आपले प्रयत्न चालु आहेत. महिला बचत गटांसाठी त्यांना कर्ज देणे, त्यांच्या मालाला बाजारपेठ शोधून देण्याचे काम आपण येत्या काळात करणार आहोत. छोट्या तलावांच्या देखभाल दुरूस्तीसाठी 3 ते 4 कोटी निधी मंजूर आहे. गोदावरी खोरे सोडून नवीन सहा कोटींचे बंधारे मंजूर आहेत. ती सर्व कामे येत्या काळात करायची आहे. त्यासाठी आपण कार्यकर्त्यांनी गावागावात घराघरात आपल्या कामाच माहिती पोहचवली पाहिजे, अशी अपेक्षा ना. शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.
खा. सदाशिव लोखंडे यांनी अध्यक्षीय भाषणात अकोलेमध्ये मिनी एमआयडीसी आणि अकोले - देवठाण मधुन पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच तोलार खिंडीतून मुंबई मार्ग काढण्यासाठी ना. नितीन गडकरी यांची भेटून मंजुरी घेणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी बारमाही काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सुतोवाच खा. लोखंडे यांनी यावेळी केले. अकोल्याचे कार्यकर्ते संघटनात्मक काम करण्यासाठी चिकाटीचे आहेत. अशी कौतुकाची थापही त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीवर मारली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र धुमाळ यांनी केले. अध्यक्षीय सुचना रामहरी तिकांडे, अनुमोदन माधव तिटमे यांनी दिले. यावेळी तालुका प्रमुख मच्छीन्द्र धुमाळ यांनी आपले मनोगतात म्हणाले की,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये तालुक्यातील प्रत्येक गणामध्ये शिवसेनेची भूमिका,विचार पोहोचविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. आज पासून शिव सम्पर्क अभियान सुरू करावयाचे असून त्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा. महिलांना जास्तीतजास्त सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला आघाडीच्या मंगला शेलार यांनी महिलांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना महिला बचतगटांना कर्ज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. या प्रसंगी ज्येष्ठ नेते माधवराव तिटमे, युवा नेते प्रदीप हासे, माजी जि. प. सदस्या सौ. अनिताताई मोरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगलाताई शेलार, पं. स. सदस्य नामदेव संत आंबरे, महेश देशमुख, महेश हासे, संदेश एखंडे, भाऊसाहेब गोर्डे, संतोष मुतडक, तेजस नवले, सिताराम शेटे, नंदु वाकचौरे, अजय वर्पे, सर्व शाखा प्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख, विभाग प्रमुख सर्व शिवसैनिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले तर प्रदीप हासे यांनी आभार मानले.
FlNXrdvG