शेवगाव । वीरभूमी- 15-Jul, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील प्रभूवाडगाव ते नागरे वस्ती ते गदेवाडी रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या रस्त्यासाठी अनेकदा निधी मिळूनही काही लोकांमुळे तो अद्याप पर्यंत होऊ दिला नसल्याने शेवगावच्या तहसिलदार सौ. अर्चना पागीरे व जि. प. सदस्या सौ हर्षदा काकडे यांनी जे.सी.बी.वर ताबा मिळवत अतिक्रमण हटविले व सदरचा रस्ता अतिक्रमण मुक्त केला. यामुळे तेथील ग्रामस्थांनी तहसीलदार अर्चना पागिरे व जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांचे आभार मानले.
प्रभूवाडगाव ते नागरे वस्ती हे अंतर दोन ते अडीच किलोमीटर एवढे आहे. सदरच्या रस्त्यावर नागरे वस्ती, खेडकर वस्ती, हरिजन वस्ती असे मिळून जवळपास 60 ते 70 कुटुंब राहतात. या वस्त्यावर राहणार्या कुटुंबांना गावात येण्या-जाण्यासाठी गदेवाडी ते प्रभूवाडगाव हा एकमेव रस्ता आहे. गावातील 80 टक्के लोकांच्या जमिनी देखील याच रस्त्यावर असल्याने शेतकर्यांना देखील याच रस्त्याने ये - जा करावे लागते.
तसेच कमी अधिक पाऊस झाला तर रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना शाळेला जाता येत नाही. हा रस्ता गावातील एका व्यक्तीने अडवला असल्यामुळे वेळोवेळी या रस्त्यासाठी निधी मिळूनही हा रस्ता अद्याप पर्यंत झाला नाही. या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत या व्यक्तींना अनेकवेळा विनंती केली. परंतु त्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने शेवगावच्या तहसिलदार अर्चना पागीरे व जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी जे.सी.बी.वर ताबा मिळवत सदरचा रस्ता अतिक्रमण मुक्त केला.
यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी किशोर पवार, ग्रामसेवक संचेती दळवी, अशोक ढाकणे, दिपक बटूळे, रविंद्र कराड, देविदास ढाकणे, शेषराव बटूळे, शरद दराडे, गोकुळ अंगरखे, बाळासाहेब जायभाय आदि प्रमुख उपस्थितीत होते.
तसेच सालवडगाव ते माळेगाव शिव हा पानंद रस्ता खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांनी जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्याकडे केली होती. सालवडगाव गावापासून माळेगाव शिव पर्यंतचा हनुमान वस्ती रस्ता दोन ते अडीच किमी अंतराचा आहे. सदरच्या रस्त्यावर अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. या कुटुंबांना वस्तीपासून तर गावापर्यंतचा येण्या-जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो.
थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर चिकल होतो. जास्तीचा पाऊस झाल्यावर मात्र ग्रामस्थांना शेजारील शेतीच्या बांधावरून चिखल तुडवत वाट शोधावी लागते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गैरसोय होते. या रस्त्याच्या अडचणीमुळे काहींनी दुग्धव्यवसाय बंद करून पशुधन विकले तर काहींनी आपल्या शेतजमिनी पडीक ठेवल्या आहेत.
यावेळी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी तहसिलदार अर्चना पागीरे यांच्या समवेत ट्रॅक्टरमधून सदरच्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी तहसीलदार अर्चना पागीरे यांनी तलाठी पोटे के. डी., मंडळ अधिकारी अनिल बडे व श्रीकांत गोरे अ.का. यांना सदरच्या रस्त्याचा पंचनामा करून सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सरपंच आण्णासाहेब रुईकर, आदिनाथ लांडे, विठ्ठल भापकर, तुळशीराम रुईकर, अनिल लांडे, पंडित लांडे, शिवाजी औटी, शेषराव टेकाळे, रामनाथ रुईकर, पंडित काकडे, काशिनाथ भापकर प्रमुख उपस्थितीत होते.
Comments