मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती । उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची दिली ग्वाही
मुंबई । वीरभूमी- 16-Jul, 2021, 12:00 AM
कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होतांना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान ठरत आहे. यामुळे राजकीय कार्यक्रम, आंदोलने, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम यामुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच देशपातळीवर धोरण आणावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने उचललेली ठोस पाऊले आणि तिसर्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत दिली. या बैठकीला सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित केली होती, यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्या लाटेचे शेपूट अजुनही वळवळत आहे. त्यातच रुग्ण संख्या घटत असली तरी ती पूर्णपणे कमी झालेली नाही. फक्त महाराष्ट्रातचं नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडत आहेत. लोक गर्दी करत आहेत. प्रामुख्याने रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरु झाल्याने गर्दी वाढत आहे. तसेच धार्मिक, राजकीय कारणांसाठीही गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करत आहेच मात्र केंद्र सरकारने आपल्या पातळीवर गर्दी रोखण्यासाठी व्यापक धोरण आखावे.
महाराष्ट्र राज्य कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असून या दरम्यान उद्योगांना फटका बसू न देण्यासाठी तशा उपाययोजना करण्यात येत आहेत, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याला जास्तीत जास्त कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस मिळावे, महत्त्वाच्या औषधांच्या किंमती नियंत्रित कराव्यात. कोविड नंतर लागणार्या उपचारांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची केंद्रे सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला मदत करावी, अशी विनंती केली.
यापुढील काळात कोविड संसर्गामुळे उत्पादन व सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. कोरोना काळात व्यवहार सुरू राहण्यासाठी काळजी घेण्यात येत आहे. उद्योगांसाठी कोविड विषयक टास्क फोर्स तयार केला असून मुख्यमंत्री सचिवालय त्याचे सनियंत्रण करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री यांनी दिली.
Comments