हटता हटेना राष्ट्रीय महामार्गाचे विघ्न
पाथर्डी । वीरभूमी- 19-Jul, 2021, 12:00 AM
रडतखडत व अतिशय बेजबाबदारपणे पाथर्डी शहर व तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे काम कित्येक वर्षापासून सुरू आहे. शहरातील आंबेडकर चौक व नाईक चौकामध्ये आठ दिवसापूर्वी नव्याने बनवलेला रस्ता मोठ्या प्रमाणात फोडुन ठेवला आहे. हा रस्ता फोडताना पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पुन्हा शहरात निर्जळी झाली असून याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.
अनेक ठिकाणी जुना रस्ता खोदुन ठेवणे, गटार व रस्ता खोदत असताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने वारंवार पिण्याची पाईपलाईन, टेलिफोनची केबल, शहराच्या स्ट्रीट लाईट व इतर विद्युत विभागाची केबल आदींची वारंवार तुटफुट होत आहे. तसेच पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
शहरातील स्ट्रिट लाईटचा वीजपुरवठा खंडित होऊन शहरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे विनाकारण नगरपालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवक व पाणीपुरवठा विभागाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र संबंधित ठेकेदार, अधिकार्यांना याची कुठलीही जाणिव नसल्याने शहरवासीयांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.
विशेष म्हणजे दर्जाहीन पद्धतीने करण्यात आलेला नवीन रस्ता देखील अवघ्या आठ दिवसांमध्ये विविध ठिकाणी ठेकेदाराकडून फोडण्यात आला आहे. याकडे देखिल महामार्ग अधिकार्यांचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होत आहे.
एवढेच नव्हे तर आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आदींनी ठेकेदाराला वेळोवेळी समज देऊन देखील कामामध्ये कुठलाही बदल होत नसल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकूणच राष्ट्रीय महामार्गाच्या यंत्रणेवर नियंत्रण आता कुणी ठेवावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
yfgSwJINQAKZe