ही तर सत्तेसाठी विरोधकांची चिखलफेक
काष्टी सेवा संस्थेतील गैरकारभाराच्या आरोपावर विरोधकांना भगवानराव पाचपुते यांचे प्रतिउत्तर
श्रीगोंदा । वीरभूमी - 22-Jul, 2021, 12:00 AM
वर्षांपासून संस्थेत कारभार पाहत असल्याने माझ्या पारदर्शी कारभारामुळे विरोधकांकडे कुठलेही मुद्दे नसल्याने निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विरोधक माझ्यावर व आशिया खंडातील अग्रगण्य असलेल्या सहकार महर्षी सेवा संस्थेवर चिखलफेक करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. व त्यातून सभासदांची दिशाभूल करून सत्ता मिळवण्यासाठी संस्थेवर भ्रष्टाचाराचे केविलवाणे आरोप केले जात आहेत, असे प्रतिपादन सहकार महर्षी काष्टी सोसायटीवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना संस्थेचे मार्गदर्शक संचालक भगवानराव पाचपुते यांनी केले. काष्टी येथे गुरुवार दि.22 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाचपुते बोलत होते.पाचपुते आरोपाबाबत खुलासा करताना म्हटले की, सहकार खात्याने कलम 83 चौकशीनंतर संस्थेच्या संचालक मंडळास कलम 146 ची नोटीस बजावलेली आहे.याबाबत सविस्तर खुलासा वेळेत सादर केला जाईल. दि. 31/3/2019 पूर्वी ज्यादा कर्जाची 100 टक्के वसुली संस्थेने केली आहे. कलम 146 नोटिशीची चिंता संचालक मंडळास नाही. कलम 146 च्या नोटीसीचा आधार घेत तक्रारदार सभासदांची दिशाभूल करत आहेत. नोटीसी संदर्भात संचालक मंडळ सविस्तरपणे उत्तर देणार आहे.
राजकीय दबाव आणून नोटीस काढून संस्थेची बदनामी करणे. विरोधक संस्थेच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या रचत आहेत. अनियमित कर्ज वाटप म्हणजे भ्रष्टाचार नाही. या वाटपाची संपूर्ण वसुली केली आहे. सन2020 -21 मध्ये संस्थेला एकूण 37 लाखाचा नफा झाला आहे. जिल्ह्यात सहकारात अनेक संस्था असूनही कोणत्याही सहकारी संस्थेला सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त करता आला नाही. ज्यांना सहकाराचे ज्ञान नाही अशांकडून संस्थेला मिळालेल्या पुरस्कारांवर बोलण्याचा अधिकार नाही.
पुढे बोलताना पाचपुते म्हणाले मी विठ्ठल काकडे व अनेकजणांना अध्यक्षपदाच्या संधी दिल्या. पण पदावरून काढल्यावर यांना भ्रष्टाचार दिसू लागला काकडे यांनी स्वतःला 30 एकर क्षेत्र असताना अनियमित कर्ज उचलून 62 एकर क्षेत्रावर 32 लाख 64 हजार 719 रुपये बोगस कर्ज घेऊन 18 लाख 2 हजार 822 रुपये कुटुंबातील भाऊ, पत्नी, सुनबाई, मुलगा, पुतण्या, यांच्या नावे कर्ज घेऊन कर्जमाफी मिळवली. पदाचा गैरवापर करून संस्थेची 5 लाख रुपयांची घेतलेली रक्कम नाकारली. त्यामुळेच संचालक मंडळाने त्यांना दूर केले. परदेश दौर्यात माझा मुलगा स्वखर्चाने फिरायला गेला यात दुःख वाटण्याचे कारण नाही. याउलट संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्वतःला पंडित समजणारे काकडे हे रामा कृषी कंपनीकडून जगन्नाथ पुरीला सहलीला गेले.
कैलास पाचपुते यांनी संचालक नसतानाही संस्थेच्या पैशावर झुआरी कंपनीकडून रामेश्वर सहल केली याचा विसर त्यांना पडलेला आहे. कैलास पाचपुते अध्यक्ष असताना त्यांनी संस्थेतून 2 लाख 70 हजार रुपये संस्थेच्या व्यवस्थापकाकडून घेतले. यातील 1 लाख जमा केले बाकीची रक्कम अजूनही येणे बाकी आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे कर्ज घेतले परंतु परतफेड केली. पण आरोप करणारे कैलास पाचपुते यांनी पदावर असताना त्यांच्या कुटुंबाच्या नावे घेतलेली कर्जे तेरा वर्षांपासून थकबाकीत आहे.
तक्रारदार सुनील माने यांच्या नावे कमी क्षेत्र असताना त्यांनी एक लाख 41 हजार कर्ज घेतले तसेच मातोश्री यांच्या नावे 41 आर क्षेत्र असताना 38 हजार रुपयेची उचल कर्ज म्हणून घेतली त्याची नियमित फेड केली नाही. त्यामुळे त्यांनी नैतिकतेचा आव आणू नये. माने ज्या संस्थेत काम करतेत तिथे मी कारखान्याचा उपाध्यक्ष असताना मीच नौकरीला लावले. संस्थेचे सचिव एस. बी. बुलाखे यांना तत्कालीन अध्यक्ष काकडे यांच्या गैरकारभारामुळे निलंबित व्हावे लागले. परंतु ते प्रामाणिक होते म्हणून त्यांनी 24 वर्षे सेवा केली भ्रष्टाचारात त्यांचा कुठलाही हात नाही. हे आता सिद्ध झाले आहे. कलम 83 ची चौकशीमध्ये सभासदांना ज्यादा कर्ज दिले ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी दुष्काळ असल्याने बँकेनेच थकबाकीदारांना कर्ज वाटप धोरण अंमलात आणले.
ज्या सभासदांना कर्ज वाटप झाले त्या सभासदांचे कर्ज वेळेत वसूल झाले आहे. संस्थेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसून त्याची संचालक मंडळालाही चिंता नाही. मी गेली चाळीस वर्षे सहकारात चांगले काम केले आहे. त्यामुळे संस्थेस देशपातळीवरील व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. स्व. शिवाजीराव नागवडे, स्व. शिवरामअण्णा पाचपुते, खासदार सुजय विखे यांच्या खांद्याला खांदा लावून निस्वार्थपणे समाजकारण केले आहे. या संस्थेत मला स्वर्गीय शिवराम अण्णा पाचपुते यांनी काम करण्याची संधी दिली त्यांची मान कधी खाली जाऊन देणार नाही.
संस्थेच्या सर्व विभागाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार हे संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने चालू आहेत त्यामुळे तक्रारदार विरोधकांची पोटदुखी वाढली आहे. खोटे आरोप करून सभासदांच्या अन्नात कुणीही माती कालवू नये. भविष्यात सभासदांनी आपल्यावर अविश्वास दाखवला तर संस्थेचे सर्व कारभार तक्रारदार विरोधकांच्या हातात देऊ असे भगवानराव पाचपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेला अध्यक्ष विठोबा पाचपुते, माजी उपाध्यक्ष भैरवनाथ कोकाटे, संचालक अधिकराव चव्हाण, लक्ष्मीकांत पाचपुते, विठ्ठलराव पाचपुते, संदीप पाचपुते, नानासाहेब पाचपुते, नवनाथ पाचपुते, सचिव गणेश पाचपुते यांच्यासह मान्यवर हजर होते.
ते माझ्या हाताखाली कर्मचारी होते. गेली 40 वर्षापासून सहकारात चांगले काम करताना आपण मोठ्या मनाने अनेकांना संस्थेत काम करण्याची संधी दिली. पण ज्यांना संधी दिली ते मला ज्ञानाची भाषा सांगतात. पण काही वर्षापूर्वी स्वतःला पंडीत समजणारे विठ्ठल काकडे हे माझ्या हाताखाली कर्मचारी म्हणून होते याचे भान त्यांना राहिले नाही, असा टोलाही भगवानराव पाचपुते यांनी विरोधकांना लावला.
Comments