कर्जत । वीरभूमी - 29-Jul, 2021, 12:00 AM
स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत आणि हरीत कर्जतसाठी मागील 300 दिवसापासून असंख्य हात श्रमदानाच्या माध्यमातून झटत असून बुधवारी श्रमदानाचे त्रिशतक पूर्ण झाल्याचे औचित्य साधत वृक्षरोपण व महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यासह महिला वर्ग आणि बाळ गोपाळ यानी हजेरी लावत अवघ्या काही मिनिटातच तब्बल 365 वृक्षाचे रोपण पार पाडले. शेवटी महाश्रमदान निम्मित सायकल रॅली काढत हुतात्मा स्मारक येथे समारोप करण्यात आला.
कर्जत नगरपंचायतीने माझी वसुंधरा स्पर्धेत सहभाग घेतला असून त्या अनुषंगाने मागील 299 दिवसापासून सर्व सामजिक संघटना यांच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी झाली आहे. दररोज सकाळी रोज एक तास कर्जतमधील असंख्य हात सुंदर कर्जत - हरीत कर्जतसाठी ध्येयवेडे बनले आहेत. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानानंतर माझी वसुंधरासाठी सर्व सामजिक संघटनेच्या श्रमदात्यानी आपली कंबर कसली होती.
5 जुन रोजी महाराष्ट्र राज्यात माझी वसुंधरा 2020 - 21 या वर्षी कर्जत नगरपंचायतीने दुसरा क्रमांक प्राप्त करीत मोठे यश मिळवले होते. यंदा आपला प्रथम क्रमांक हुकला म्हणून या श्रमदात्यांनी आपली मोहीम आणखी तीव्र करीत अखंडपने श्रमदान करण्याची प्रक्रिया कायम ठेवली. बुधवार, दि 28 रोजी याच श्रमदानाचा 300 वा दिवस असल्याने सर्व सामजिक संघटनेच्या शिलेदारानी महाश्रमदान आणि विक्रमी 365 वृक्षाचे रोपण करण्याचे व्रत हाती घेत ते प्रभातनगर या ठिकाणी यशस्वी पुर्ण केले. अवघ्या काही मिनिटातच सदरचे विक्रमी वृक्षारोपण शेकडो हातानी सहज पार पडले.
यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, सहायक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, मुख्याधिकारी गोविंद जाधव, प्रा. डॉ. बाळ कांबळे, एनसीसी प्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे माजी तालुकाप्रमुख अशोक खेडकर, उपसभापती राजेंद्र गुंड, विरोधी पक्षनेत्या पुजा मेहेत्रे यासह मोठ्या संख्येने श्रमदाते सहभागी झाले होते.
यावेळी सर्व सामाजिक संघटनेच्यावतीने निवृत्त वन अधिकारी तथा श्रमदाते अनिल तोरडमल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, श्रमदानाचा 300 दिवस निश्चित कर्जतकरासाठी अभिमानास्पद ठरला असून मागील अनेक दिवसापासून सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक परिसराचा कायापालट झाला आहे. भविष्यात कर्जत निश्चित हरीत कर्जत झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
प्रत्येक श्रमदात्यांनी दररोज मोठ्या संख्येने श्रमदान करीत माझी वसुंधरा स्पर्धेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. यासह पुढील काळात कर्जतकराचा लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढवून स्वच्छ सुंदर कर्जत - हरीत कर्जतसाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी उपस्थितांना माझी वसुंधराची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नेवसे आणि भाऊसाहेब रानमाळ यांनी केले तर आभार प्रा. विशाल मेहेत्रे यांनी मानले. शेवटी सर्व उपस्थित श्रमदात्याना अभय बोरा आणि विशाल छाजेड यांनी अल्पोहार दिला.
Comments