तहसीलदारांची कारवाई । मंगल कार्यालय कोरोना संपेपर्यंत सील
शेवगाव । वीरभूमी- 29-Jul, 2021, 12:00 AM
वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाय योजनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेवगाव शहरातील ममता लॉन्सवर कारवाई करत लॉन्स कोरोना संपेपर्यंत सील करण्यात आले आहे.
तसेच लॉन्स मालकासह वर-वधू व पालक अशा सात जणांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कठोर पावले उचलली जात आहेत. अनेकवेळा जनजागृती करूनही नागरिक दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कठोर पावले उचलली जात आहेत.
त्यातच काल बुधवारी विभागिय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दूरदृश्यपणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना करत नियम मोडणारी दुकाने, मंगल कार्यालये यांच्यावर सील बंदची कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
या सुचनानंतर शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आज गुरुवारी मिरी रोडवरील ममता लॉन्स येथे विवाह सोहळा होता. तेथे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी पथकासह भेट दिली असता विवाह सोहळ्याला 50 जणांच्या उपस्थितीतीला परवानगी असतांना तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.
यामुळे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी ममता लॉन्सवर सील बंदची कारवाई केली. तसेच शेवगाव पोलिस ठाण्यात लॉन्स मालक शब्बीर शेख याच्यासह अमोल दादासाहेब फासाटे (वर), दादासाहेब काशिनाथ फासाटे (वर पालक), शिला दादासाहेब फासाटे (वरमाई), दत्तात्रय शांताराम पादीर (वधू पालक), वर्षा दत्तात्रय पादीर (वधू माता) व जान्हवी दत्तात्रय पादीर (वधू) अशा सात जणांवर शेवगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम 188, 269, 270 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईने नियम मोडणार्यांचे धाबे दणाणले असून यापुढेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अशा कारवाया सुरुच राहणार आहेत. यामुळे नियम मोडतांना विचार करावा लागणार आहे.
Comments